नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात तीन हायकोर्टाची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आहे आहे. यामध्ये बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली.
मुंबई बरोबरच कलकता हायकोर्टाचे कोलकाता हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्टाचे चेन्नई हायकोर्ट असे नाव बदलायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे बॉम्बे हायकोर्ट आता मुंबई हायकोर्ट म्हणून ओळखले जाईल. १९९५मध्ये बॉम्बे शहराचे मुंबई असे नामकरण झाले. पण त्यानंतरही बॉम्बे हायकोर्टाच्या नावात बदल झाला नव्हता.
बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करावे, अशी शिवसेनेची मागणी होती. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे युती सरकार १९९५ मध्ये पहिल्यांदा सत्तेवर आले त्यावेळी बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई असे नामकरण झाले. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांचीही भेट घेऊन मुंबई उच्च न्यायालय असे नामकरण करण्याची मागणी केली होती.