सिंगापूरहून पीडित तरुणीचा मृतदेह भारतात

दिल्लीतल्या बलात्कार पीडित तरुणीचा मृतदेह भारतात आणण्यात आलाय. एअर इंडियाचं खास विमान तरुणीचा मृतदेह घेऊन पहाटे साडेतीन वाजता दिल्लीत दाखल झालं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 30, 2012, 07:27 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्लीतल्या बलात्कार पीडित तरुणीचा मृतदेह भारतात आणण्यात आलाय. एअर इंडियाचं खास विमान तरुणीचा मृतदेह घेऊन पहाटे साडेतीन वाजता दिल्लीत दाखल झालं.
तिच्यावर सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी रात्री सव्वादोन वाजता तिचं निधन झालं. पीडित तरुणी तब्बल १३ दिवस आधी दिल्लीतल्या आणि नंतर सिंगापूरमधल्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती.

दिल्लीत तिच्यावर चालत्या बसमध्ये बलात्कार झाला होता. या प्रकरणात आरोपींवर बलात्काराबरोबरच कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. फास्ट ट्रॅक कोर्टात दररोज सुनावनी होण्यासाठी एका विशेष लोक अभियोजकाची नियुक्ती करण्यात आलीय’ अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय.
पोलिसांनी या आरोपींविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), २०१ (पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न), ३६५ (अपहरण), ३७६ – २ जी (सामूहिक बलात्कार), ३७७ (असामान्य अपराध), ३९४ (जखमी करणं) आणि ३४ नुसार गुन्ह्याची नोंद केली होती. त्यामध्ये आता कलम ३०२ (हत्या) नुसार गुन्ह्याची नोंद केलीय.