www.24taas.com, नवी दिल्ली
शनिवारी मध्यरात्री सिंगापूरच्या हॉस्पीटलमध्ये अंतिम श्वास घेणाऱ्या पीडित मुलीची आजवरचा प्रवास सोपा नव्हता. ‘ती’ मूळची उत्तरप्रदेशची... आपली शाळा आणि कॉलेजची फी भरण्यासाठी मुलांचं ट्युशन घेऊन ती इथवर पोहचली होती.
‘ती’च्या कुटुंबीयांशी संबंधित असलेल्यांच्या माहितीनुसार, ती एक कठोर मेहनत घेणारी आणी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहणारी मुलगी होती. ‘ती’चं कुटुंब गेल्या काही वर्षांपासून दिल्लीत स्थायिक झालं होतं. दक्षिण दिल्लीच्या एका मध्यमवर्गीय परिसरात ते राहत होते. याच ठिकाणी तिचा जन्मही झाला होता.
वडिलांनी आपल्या मुलीची हुशारी बघून तिच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज काढलं होतं. आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती फिजिओथेरेपिस्टचं प्रशिक्षण घेण्यासाठी ती देहरादूनला गेली होती. दिल्लीला परतल्यानंतर उत्तर दिल्लीमधल्या एका खाजगी हॉस्पीटलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून ती रुजू झाली होती.
घरातील मुलांमध्ये सर्वात मोठी असल्यानं तीनं यश मिळवावं, जेणेकरून तिच्या दोन छोट्या भावांनाही प्रेरणा मिळेल अशी कुटुंबीयांचीही इच्छा होती. इतरांप्रमाणेच तीच्या कुटुंबीयांचीही इच्छा होती की त्यांच्या मुलीलाही चांगल्या ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, अशी माहिती कुटुंबीयांच्या जवळच्या एका सूत्रानं दिली. पण, या कुटुंबाचं स्वप्न १६ डिसेंबरच्या रात्री धुळीला मिळालं.