नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांचा सल्ला मानला असता, तर काश्मीर, आणि तिबेट सारखे प्रश्नच उभे राहिले नसते...हा गौप्यस्फोट आहे काँग्रेसशी संबंधित एका नियतकालिकाचा. 'काँग्रेस दर्शन' नावाच्या या नियतकालिकात लेखकाच्या नावाशिवाय छापण्यात आलेल्या एका लेखात हा दावा करण्यात आलाय.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे या नियत कालिकाचे संपादक आहेत, हे विशेष... नियत कालिकात सरदार पेटलांना आदरांजली वाहणारा लेख छापण्यात आलाय. सरदार पटेल, हे नेहरूंचे स्पर्धक असल्याचं मानलं जात असे. सरदार पटेलांची मुस्लिम समाजाविषयी काही कठोर मतं होती. त्यामुळे ते पंतप्रधान होऊ नयेत असं महात्मा गांधींचं मत होतं. त्यामुळेच सरदार पटेल यांनी आपली उमेदवारी मागे घेतली, असं लेखात म्हटलंय.
शिवाय नेहरूंकडे परराष्ट्र खात्याचाही भार होता. आणि त्यांनी काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय मुद्दा केला. पण पटेल उपपंतप्रधान असल्यानं परराष्ट्र व्यवहारसंदर्भातल्या समित्यांमध्ये त्यांचा आणि नेहरूंचा नेहमीचं सामना होत असे. त्याकाळी जर सरदार पटेलांचं म्हणणं ऐकलं असतं, तर काश्मीर, चीन, तिबेट, आणि नेपाळचे आज निर्माण झालेले प्रश्न अस्तित्वातच आले नसते, असंही या लेखात म्हटलंय.