काळं धन : 'एक लाख करोड'हून जास्त ब्लॅक मनी जप्त

सरकारनं गेल्या आर्थिक वर्षात एक लाख करोड रुपयांहून अधिक काळं धन जप्त केलंय. 

Updated: Jul 17, 2014, 10:42 AM IST
काळं धन : 'एक लाख करोड'हून जास्त ब्लॅक मनी जप्त title=

नवी दिल्ली : सरकारनं गेल्या आर्थिक वर्षात एक लाख करोड रुपयांहून अधिक काळं धन जप्त केलंय. 

2012-13 दरम्यान जमा झालेल्या आयकर विभागाच्या धाडींतून आणि जप्तीच्या कारवाईतून एकूण रक्कमेच्या दुप्पटीपेक्षा जास्त रक्कम गेल्या आर्थिक वर्षात जमा झालीय. 

अधिकृत आकड्यांनुसार, आयकर विभागानं आर्थिक वर्ष 2013-14 दरम्यान केलेल्या कारवाईत 10,791.63 करोड रुपयांचं अघोषित उत्पन्न जप्त करण्यात आलंय. तर ‘सर्व्हे अभियाना’त 90,390.71 करोड रुपये काळं धन सापडलंय. त्यामुळे या दोन्ही कारवाईत जप्त झालेलं एकूण उत्पन्न 1,01,181 करोड रुपयांवर गेलंय. 

कर चोरी थांबविण्यासाठी आयकर विभागानं या धाडी टाकल्या होत्या. कर चोरी करणाऱ्यांत व्यक्ती, व्यावसायिक कंपन्या, कॉर्पोरेट आणि अन्य वित्तीय संस्थांचाही समावेश होता. या कारवाई दरम्यान आयकर विभागानं 807.84 करोड रुपयांची ज्वेलरी, एफडी आणि रोख रक्कम जप्त केलीय. विभागानं जवळपास 569 संस्थांवर धाडी टाकल्या होत्या. 

सर्व्हे अभियानात गेल्या आर्थिक वर्षात एकूण 5327 सर्व्हे केले गेले. या अभियानात उघड झालेली एकूण अघोषित रक्कम 90,390.71 करोड रुपये आहे... आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे, यामध्ये 71,195 करोड रक्कम केवळ एका कॉर्पोरेट समूहाकडून जप्त करण्यात आलीय. हा कॉर्पोरेट समूह ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहे.

एका वरिष्ठ आयकर अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, काळ्या धनाच्या शोध मोहिमेंच्या संख्येत वाढ झालीय आणि हे चांगले संकेत आहेत. यावरून देशात, आयकर विभागाची देशातील सक्रियता वाढल्याचं चित्र समोर येतंय. कर चोरी रोखण्यासाठी सर्व्हे अभियान आयकर विभागाचं महत्त्वपूर्ण हत्यार बनलंय.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.