स्मृती इराणींचा अपमान काँग्रेस खासदारांनी रोखला!

संसदेत पुन्हा एकदा बहुपक्षीय महिला खासदारांच्या एकजुटीचा प्रत्यय आलाय. हे चित्र तेव्हा दिसलं, जेव्हा तृणमूल काँग्रेसच्या एका खासदारानं मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईरानी यांच्या अभिनयाच्या करिअरवर चुटकी घेण्याचा प्रयत्न केला...  

Updated: Jul 17, 2014, 10:22 AM IST
स्मृती इराणींचा अपमान काँग्रेस खासदारांनी रोखला! title=

नवी दिल्ली : संसदेत पुन्हा एकदा बहुपक्षीय महिला खासदारांच्या एकजुटीचा प्रत्यय आलाय. हे चित्र तेव्हा दिसलं, जेव्हा तृणमूल काँग्रेसच्या एका खासदारानं मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईरानी यांच्या अभिनयाच्या करिअरवर चुटकी घेण्याचा प्रयत्न केला... यावेळी भाजप खासदार असेल्या स्मृती यांच्या मदतीला काँग्रेसच्या दोन महिला खासदार धाऊन आल्याचं दिसलं. 

‘मिड डे मील’बाबत पूरक प्रश्न विचारताना तृणमूल काँग्रेसचे नेते सुल्तान अहमद यांनी स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला. 

‘मंत्री महोद्या लोकांच्या घरात ‘आदर्श बहू’च्या रुपात ओळखल्या जातात... त्यांनी ‘सास भी कभी बहू थी’ हा कार्यक्रम संपूर्ण पाहिलाय आणि त्यांना मंत्रीमहोद्यांकडून त्यापेक्षा चांगल्या कामाची अपेक्षा आहे’ असं वक्तव्य सुल्तान अहमद यांनी केलं. 

यावर, भाजप खासदारांच्या अगोदरच काँग्रेसच्या खासदार रंजीत रंजन आणि सुष्मिता देव यांनी अहमद यांच्या या टिप्पणीचा जोरदार विरोध केला. ‘अहमद यांच्या या वक्तव्याचा सदनाच्या कामाशी काहीही देणं-घेणं नाही’ असे खडे बोल या महिला खासदारांनी सुनावले.  

त्यानंतर मात्र, अहमद यांना आपले शब्द मागे घ्यावे लागले. त्यानंतर, पूरक प्रश्न विचारण्याअगोदर सुष्मिता देव यांनी अहमद यांच्या या टिप्पणीवर खेद व्यक्त केला.

यावेळी, त्यांनी मनुष्यबळ विकास मंत्री पदाचा पदभार ग्रहण करण्यासाठी स्मृती इराणी यांना शुभेच्छाही दिल्या. ‘एक महिला म्हणून आपल्याला स्मृती यांच्या कर्तृत्वाचा गर्व आहे’ असं सुष्मिता यांनी संसदेसमोर म्हटलं. याबद्दल स्मृती इराणी यांनी सुष्मिता यांचा धन्यवादही म्हटलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.