www.24taas.com, झी मीडिया, कोल्लम, केरळ
एका चिमुकल्याच्या पोटातून तब्बल २२ सुया निघाल्यात. होय, हे खरं आहे. हा चिमुकला केवळ एका वर्षांचा आहे.
केरळमधल्या कोल्लम जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. अवघ्या एका वर्षाच्या बाळाच्या पोटातून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तब्बल २२ सुया बाहेर काढल्यात. केरळमध्ये राहणाऱ्या बालन आणि धान्या या दाम्पत्याच्या चिमुकल्या बद्रीनाथला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास झाल्यानं त्याला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी या बाळाच्या पोटाची सोनोग्राफी करून तपासलं असता बाळाच्या पोटात काही धातूच्या वस्तू डॉक्टरांना आढळल्या. दरम्यान, बाळाची तब्येत खुपच बिघडल्याचं जाणवत असताना डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी तासाभराच्या शस्त्रक्रियेअंती पोटातून २२ सुया बाहेर काढल्या. या शस्त्रक्रियेनंतर मुलाच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आहे.
याबद्दल माहिती देताना बाळाच्या आईवडिलांनी या सुया कागदात गुंडाळून ठेवल्या असतील आणि बाळानं त्या तोंडात टाकल्या असतील. पण, कागद असल्यानं त्याच्या घशाला आणि आतड्याला जखमा झाल्या नाहीत, असं डॉक्टरांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.