www.24taas.com, नवी दिल्ली
इंग्लडविरुद्ध होणाऱ्या वन डे सिरिजमधून धडाकेबाज ओपनर वीरेंद्र सेहवाग याला डच्चू देण्यात आल्याने निवडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. खराब फॉर्ममुळे सेहवागची निवड करण्यात आली नाही. परंतु, तोच न्याय गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांना लावण्यात आला नाही.
धोनी आणि सेहवाग यांच्यात सुरू असलेल्या शीत युद्धामुळे सेहवागला बाहेरचा रस्ता पकडावा लागल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता सेहवागचे वन डे करिअर धोक्यात आले आहे.
या संदर्भात माजी खेळाडूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सेहवागला टीममधून बाहेर काढल्याने टीम इंडियाची स्थिती चांगली होणार का असा सवाल माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांनी ट्विटरवर विचारला आहे. टीम का ढेपाळली याचे खरे कारण अजूनही कायम असताना या संदर्भात कोणी बोलत नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
तसे सेहवागला डच्चू देऊन निवड समितीने खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना कठोर संदेश दिला आहे. दरम्यान, सेहवागसाठी दिलाशाची गोष्ट म्हणजे त्याला टेस्ट टीमचा ओपनर म्हणून ठेवण्यात निवड समिती सकारात्मक आहे. सेहवागची धडाकेबाज फलंदाजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची डोकेदुखी ठरू शकते.
गेल्या रविवारी निवड समितीने इंग्लड विरुद्धच्या वन डे सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा केली. इंग्लड विरुद्ध सेहवाग सोडून सर्व खेळाडूंना स्थान देण्यात आले. सेहवाग ऐवजी चेतेश्वर पुजारा याला संघात स्थान देण्यात आले आहे.