कणकवलीत राणे समर्थकांचा राडा, शिवसैनिकावर हल्ला

उद्योगमंत्री नारायण राणे विरूद्ध शिवसेना असा संघर्ष सर्वांनाच माहित आहे कणकवलीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. कोकणात लोकसभा निवडणुकीचे पडसाद उमटलेत. कणकवलीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून शिवसैनिकांना बेदम मारहाण करण्यात आलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 30, 2014, 01:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कणकवली
उद्योगमंत्री नारायण राणे विरूद्ध शिवसेना असा संघर्ष सर्वांनाच माहित आहे कणकवलीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. कोकणात लोकसभा निवडणुकीचे पडसाद उमटलेत. कणकवलीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून शिवसैनिकांना बेदम मारहाण करण्यात आलीय. तसंच रात्रीच्या सुमारास पांडुरंग सावंत यांच्या घरावर दगडफेकही करण्यात आलीय. यात एकजण गंभीर जखमी झालाय.
कणकवलीपासून जवळच असलेल्या कुंभवडे गावात पी. एम. सावंत या शिवसैनिकावर ते बेसावध असताना हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी आधी वाडीतील वीज पुरवठा खंडीत केला आणि त्यानंतर सावंत यांच्या घराला लक्ष्य केलं. सावंत यांना बेदम मारहाण करताना त्यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आल्याचं कळतंय. हे हल्लेखोर राणे यांचे समर्थक होते. राणे यांचे विश्वासू गोट्या सावंत यांचा यामागे हात आहे, अशी प्रथमदर्शनी माहिती हाती येतेय.
या राड्या प्रकरणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोट्या सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गोट्या सावंत यांच्यासह ७ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलीय. जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण पसरलंय. पी. एम. सावंत आणि गोट्या सावंत यांच्यात आधीपासूनच वाद होता. या वादातून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.