मोदींचा `वैवाहिक` प्रकरण पोहचलं कोर्टात...

अहमदाबादच्या एका कोर्टाने बुधवारी पोलिसांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर `शपथ घेऊन सत्य लपवण्याचा आरोप` करणाऱ्या अर्जावर सत्यता तपासून त्यासंबंधी अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 17, 2014, 03:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
अहमदाबादच्या एका कोर्टाने बुधवारी पोलिसांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर `शपथ घेऊन सत्य लपवण्याचा आरोप` करणाऱ्या अर्जावर सत्यता तपासून त्यासंबंधी अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे, मोदींच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.
`आम आदमी पार्टी`च्या एका कार्यकर्त्याने मोदींवर शपथेवर खोटं बोलण्याचा आरोप केलाय. नरेंद्र मोदींनी आपल्या लग्नाबद्दल आत्तापर्यंत माहिती लपवून ठेवली होती, असा आरोप त्यानं केलाय. या याचिकेवर, अतिरिक्त मुख्य न्यायिक मजिस्ट्रेट एम. एम. शेख यांनी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. `तीन आठवड्यांच्या आत या प्रकरणी रिपोर्ट न्यायालयाला सुपूर्द करा` असे आदेश यावेळी न्यायालयानं दिलेत.
आप कार्यकर्ता निशांत वर्माने याआधी रानिप पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला होता आणि मोदींच्या विरोधात २०१२ सालच्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या प्रतिज्ञापत्रात लग्नाबाबत माहिती लपवण्याच्या प्रकरणावरून तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती.
मोदींनी २०१२ साली विधानसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेतील जागेचा अर्ज भरताना, निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या विवाहासंबंधी माहिती दिली नव्हती. मात्र, २०१४ च्या लोकसभेच्या प्रतिज्ञापत्रात मोदींनी पहिल्यांदाच विवाहासंबंधी माहिती देऊन, आपल्या पत्नीचे नाव हे जशोदाबेन असल्याचं जाहीरपणे मान्य केलं.
मोदींविरोधात आपच्या कार्यकर्त्यानं दाखल केलेल्या या तक्रारीवर अहमदाबाद पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यानंतर वर्मा यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोकला. वर्मा यांनी गुजरातचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनादेखील पत्र लिहून मोदींविरोधात कारवाही करण्याची मागणी केली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.