www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मांस निर्यातीचा धंदा करणाऱ्या मोईन कुरैशी नावाच्या व्यक्तीच्या घरांवर आणि ऑफिसेसवर इन्कम टॅक्स विभागाने छापे घातले. मोईन हवाला कारभार चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पण, हा मोईन कुरैशीचा इतिहास नक्की काय आहे... जाणून घेऊयात...
रामपूरमध्ये मोईन कुरैशीला लोक मुंशी मजीद म्हणून ओळखतात. रामपूरला कुरैशी रोडवर मोईनचं खानदानी घर आहे. मोईनचं इथं येणं - जाणं सध्या कमी असलं तरी स्थानिक लोक एक मांस निर्यातदार उद्योजक म्हणून त्याला ओळखतात. रामपूरमध्ये त्यांच्या मांस निर्यात फॅक्टरीत जायला कुणालाही परवानगी नाही.
सध्या मोईन कुरैशी दिल्लीमध्ये आपली पाकिस्तानी पत्नी नसरीन कुरैशी हिच्यासह राहतो. मोईन डेहराडूनच्या प्रतिष्ठित `डून स्कूल ओल्ड बॉईज असोसिएशन`चा अध्यक्ष आहे आणि योगायोगाची बाब म्हणजे देशाचे गृह राज्यमंत्री आर. पी. एन. सिंह हे देखील याच असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. मोईनच्या डी ३१८ या बंगल्यातच `डून ओल्ड बॉईज`चे ऑफिस आहे.
मोईनची कंपनी AMQ एग्रो इंडियाची उलाढाल आहे १६७ कोटी रूपयांची... मात्र, इन्कम टॅक्स खात्याचं म्हणणं आहे की, मोईनची संपत्तीच हजारो कोटी रूपयांची आहे. आयकर खात्याच्या चौकशीत आढळलं की, त्याच्या कंपनीची सात वर्षांची जेवढी उलाढाल आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त संपत्ती त्याच्याकडे आहे.
मोईनचा खरा धंदा मांस निर्यातीचा आहे, पण त्याने आणि त्याच्या नातलगांनी राजकीय नेत्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केलेत. मोईन कुरैशी शाहजहांपूरचे काँग्रेस अध्यक्ष शाहिद अन्वर कुरैशी यांचे सख्खे भावोजी मुस्लिम कुरैशीचा सख्खा भाऊ आहे. शाहिद अन्वर कुरैशी सध्या काँग्रेस खासदार जितीन प्रसाद यांच्या धौरहरा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची व्यवस्था सांभाळत आहेत.
मोईन यांची ज्या वेगाने प्रगती झालीय, ती पाहता अनेक प्रश्न उभे राहतात. मोईन कुरैशी केवळ मांस निर्यातदार होता का? जर होय, तर मग त्याने आपले राजकीय लागेबांधे का वाढवले? देशापुढं मोईन कुरैशीचं सत्य देशापुढं यायलाच हवं...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.