www.24taas.com, झी मीडिया, नंदूरबार
जगातील सर्वात मोठी लोकशाही तळागाळापर्यंत पोहोचलेलीच नसल्याच नंदूरबार लोकसभा मतदारसंघात फिरल्यावर लक्षात येतं. इथल्या जनतेला कोण कोणत्या पदासाठी निवडून येतात याचा गंधही नाही. तब्बल नऊ वेळा खासदार म्हणून निवडून येणाऱ्या काँग्रेसच्या माणिकराव गावित यांना इथला मतदार ओळखतदेखील नाही.
महाराष्ट्रातील नंदूरबार मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदार संघात ६५ टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या ही आदिवासींची आहे. याच मतदार संघातून तब्बल नऊ वेळा काँग्रेसचे माणिकराव गावित खासदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळीही ते निवडणूक लढवत असून ते निवडून आल्यास एकाच मतदार संघात तब्बल दहा वेळा एकाच पक्षाकडून निवडून येण्याच्या विश्वविक्रमाची नोंद ते करतील. मात्र, विक्रमाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या माणिकराव गावित यांना त्यांचाच मतदार ओळखत नाही ही आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे. विशेष म्हणजे, ज्या टेंभली गावात काँग्रेसने गाजावाज करत आधार कार्ड योजना सुरु केली त्या गावातील ग्रामस्थांनाही माणिकराव गावित कोण आहेत हे माहीत नाही.
तब्बल नऊ वेळा निवडून येणाऱ्या माणिकरावांना जर कोणी ओळखत नसेल तर पहिल्यांदाच निडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपच्या डॉ. हिना गावितांना इथला मतदार ओळखत असेल अशी अपेक्षा ठेवणच व्यर्थ आहे.
इथला आदिवासी प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा अधिकार बजावतो. मात्र, कुठल्या निवडणुकीत कोण निवडून येतो हेच इथल्या बहुतेक आदिवासींना माहीत नाही. याला लोकशाही म्हणावी की आणखी काही हाच विचार आपल्याला पडेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.