www.24taas.com, झी मीडिया, नांदेड
काँग्रेसचे `दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे` असावेत... भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची भाषा एकीकडे उपाध्यक्ष राहुल गांधी करतायत. तर दुसरीकडे आदर्श घोटाळ्यात अडकलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेसने नांदेडमधून उमेदवारी दिलीय.
आदर्श घोटाळ्यातील कथित सहभागामुळं ज्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं, त्याच अशोक चव्हाणांना काँग्रेसनं आता नांदेडमधून लोकसभेच्या आखाड्यात उतरवलंय. चौकशीचा ससेमिरा मागं लागल्यानं थोड्या काळासाठी का होईना, त्यांना राजकीय वनवासात जावं लागलं होतं. आता विलासराव देशमुख यांच्या निधनामुळं मराठवाड्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी, त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलंय. अलिकडेच राहुल गांधी यांनी औरंगाबादचा दौरा केला, त्यावेळी अशोक चव्हाण त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसले होते. खरं तर तेव्हाच त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं होतं. मात्र आदर्श घोटाळ्यामुळं भ्रष्टाचाराचे प्रतिक बनलेल्या चव्हाणांना लोकसभेची उमेदवारी उशिरा जाहीर करण्यात आली. ती करतानाही काँग्रेस प्रवक्त्यांना चांगलीच कसरत करावी लागली.
कॉमनवेल्थ घोटाळ्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं काँग्रेसनं पुण्याचे विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांचा पत्ता कापला. अशोक चव्हाणांना मात्र वेगळी फूटपट्टी लावण्यात आलीय. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनीही चव्हाणांच्या उमेदवारीची जोरदार पाठराखण केलीय...
काँग्रेस हायकमांडचा आशीर्वाद मिळाल्यानं अशोक चव्हाणांना दहा हत्तींचं बळ प्राप्त झालंय. नांदेडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, नांदेडचे विद्यमान खासदार भास्करराव पाटील खतगावकर देखील सोबत उपस्थित होते. नांदेडची जागा काँग्रेसच जिंकेल, असा आत्मविश्वास अशोक चव्हाणांनी यावेळी व्यक्त केला.
भ्रष्टाचाराच्या विरोधात तोंडपाटीलकी करणारे राजकीय नेते लोकसभेची तिकिटे वाटताना मात्र निवडून येण्याची क्षमता हाच एकमेव निकष लावतात. भ्रष्टाचाराचा मुद्दा मग सोयीस्करपणे दुर्लक्षित केला जातो. अशोक चव्हाणांच्या उमेदवारीमुळं राजकीय पक्षांचा हाच `आदर्श` समोर आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.