www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर टीका केलीय. `टेंगूळ आख्यान` या मथळ्याखाली आलेल्या अग्रलेखात भाजप-मनसे जवळीकीवर टीकास्त्र सोडलंय. दुश्मनांचे डोके फोडण्याऐवजी भाजप सध्या स्वतःच्या डोक्यात काठी मारुन टेंगूळ आणत असल्याची टीका यात करण्यात आलीय.
उद्धव ठाकरेंना विश्वासात न घेता गडकरी राज ठाकरेंना भेटले. यामुळे चिडलेल्या शिवसेनेनं मित्रांना खड्यासारखं बाजूला कराल, तर जनतेच्या मनातील अविश्वासाचा धोंडा डोक्यात पडले, असा धमकीवजा इशारा भाजपला दिला आहे. तर दुसरीकडे डोमेस्टिक व्हायलन्स वाढल्याचं सांगत नितीन गडकरींवर अप्रत्यक्ष निशाणा साधण्यात आला आहे. संधीसाधूंची साथ चालणार का? अशा शब्दात अग्रलेखातून मनसेवर शरसंधान साधलं आहे.
पाहूया सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय
“राजकारणात तसे कुणीच साधुसंत राहिलेले नाही. सगळेच संधीसाधू आहेत. ‘भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी’ असे आमच्या संतांनी भलेही म्हटले असेल, पण आताचे संधीसाधू लंगोटीएवढ्या सत्तेसाठी दुश्मनांचे डोके फोडण्याऐवजी स्वत:च्याच डोक्यात काठी मारून आपल्याच कपाळावर टेंगुळे आणीत आहेत. आमचे जुनेजाणते मित्रवर्य व महाराष्ट्रातील आमचे राजकीय ‘साथी’ भाजपच्या नशिबी अशी टेंगुळे आली आहेत काय? व अशा टेंगुळांना जबाबदार कोण आहे?” अशी विचारणा शिवसेनेने सामनातून केली आहे.
सोबतच "ही टेंगुळे वेळीच कमी केली नाहीत व त्यावर मैत्रीचा, विश्वासाचा झंडू बाम चोळला नाही तर राज्याराज्यांत ‘टेंगूळयुद्ध’ होऊ शकते.", असा निर्वाणीचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेला दिलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.