भररस्त्यात तरुणीचे कपडे फाडले, लोक पाहत राहिले...

वर्दळीच्या रस्त्यावर भरदिवसा एका तरुणीचे अंगावरचे कपडे फाडले जातात... आणि आजुबाजुचे लोक केवळ तमाशा पाहत उभे राहतात... हे चित्र पाहायला मिळालं महिलांसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबई शहरात...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 13, 2014, 10:15 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वर्दळीच्या रस्त्यावर भरदिवसा एका तरुणीचे अंगावरचे कपडे फाडले जातात... आणि आजुबाजुचे लोक केवळ तमाशा पाहत उभे राहतात... हे चित्र पाहायला मिळालं महिलांसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबई शहरात...
सोमवारी एका तरुणीवर भररस्त्यात काही तरुणांनी छेड काढली... तिच्या अंगावरचे कपडे फाडले... त्यांच्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी ती एका रेस्टॉरंटमध्ये घुसली तर तिथूनही तिला हाकलून दिलं गेलं. या घटनेमुळे या मुलीसहीत अनेकांना चांगलाच धक्का बसलाय.
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, दुपारी साडे चारच्या सुमारास कांदिवलीमधल्या हिंदुस्तान नाक्याजवळ ही घटना घडली. पीडित मुलगी आणि तिची मैत्रिण एका ऑटोरिक्षात बसून हिंदुस्तान नाक्याजवळ उतरल्या होत्या. यावेळी जवळ पुरेसे पैसे नसल्यानं तिची मैत्रिण जवळच्या नातेवाईकांकडे गेली. तिची वाट पाहत पीडित मुलगी रिक्षातच बसून राहिली. खूप वेळ झाला परंतु ती परतली नाही म्हणून पीडित मुलगी तिला पाहण्यासाठी रिक्षातून उतरली.
रिक्षावाल्यानं तिच्याकड़े पैशांची मागणी केली तेव्हा तीनं आपला मोबाईल फोन त्याच्याकडे देऊ केला. परंतु, यावर रिक्षावाला तिच्यासोबत भांडू लागला. एव्हाना जवळच क्रिकेट खेळणारी मुलं इथं दाखल झाली होती. त्यांनी या मुलीला चिडवण्यास सुरुवात केली.
मुलीनं त्यांना भीक घातली नाही तेव्हा संबंधित तरुणांनी तिचा पाठलाग सुरु केला... आणि भररस्त्यात तिचे कपडे फाडले. या लफग्यांपासून वाचण्यासाठी ती एका रेस्टॉरंटमध्ये दाखल झाली पण तिथून तिला बाहेर हाकलण्यात आलं. तिनं एका ऑटोरिक्षामध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. पण, आरोपी तिला तिथून खेचत घेऊन गेले.
याचवेळेस, इथं काही सुजान नागरिक दाखल झाले. त्यांनी या तरुणांना हाकलून लावलं. या भागात गस्तीवर असणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलची नजर या घाबरलेल्या तरुणीवर पडली. त्यानं दखल घेऊन या आरोपींना ताब्यात घेतलं.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये फैयाज अहमद खान, सरोज खान आणि नौशाद खान यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.