www.24taas.com, झी मीडिया, वाराणसी
निवडणुकीचा निकाल अगदी एका दिवसावर आला असतांना वाराणसीकरांसाठी खरोखरच `अच्छे दिन आने वाले है`... कारण मोदींच्या प्रेमापोटी `द टेस्ट ऑफ इंडिया` म्हणणारा जगप्रसिद्ध मिल्क ब्रँड `अमूल` वाराणसीत दाखल होत आहे.
`अमूल` वाराणसीमध्ये २०० कोटींचा डेअरी प्रोसेसिंग प्लांट उभारणार आहे. या प्रकल्पाद्वारे दररोज पाच लाख लीटर दूधाचं प्रोसेसिंग केलं जाणार आहे. गुजरातच्या बनास डेअरीमार्फत `अमूल` ब्रँडच्या नावानं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची निर्मिती आणि विक्री केली जाते. बनास डेअरी आशियातील सर्वात मोठी डेअरी आहे. या डेअरीचे अध्यक्ष पारथी भटोल यांनी `अमूल` वाराणसीत दाखल होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
वाराणसीत विमानतळाजवळ असलेल्या औद्योगिक संकुलात आम्ही मोठा भूखंड विकत घेतला आहे. युपी इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडशी करार करुन आम्ही भूखंड खरेदीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे, असं पारथी भटोल यांनी सांगितलं. लवकरच लखनऊ आणि कानपूरमध्येही अमूल पाच-पाच लाख लीटर दूधाच्या प्रोसेसिंगसाठी प्रकल्प उभारणार आहे, असंही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये दूधाचं सर्वाधिक उत्पादन होतं मात्र संघटीत क्षेत्रामार्फत जेमतेम एक लाख लीटर दूधाची विक्री होते. दूध संकलन, प्रोसेसिंग आणि विक्री यात गुंतलेल्या कंपन्या शेतकऱ्यांना पुरेसा लाभ मिळू देत नाही. मात्र `अमूल` शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देईल, असं कंपनीच्यावतीनं सांगण्यात आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.