www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
पितृत्वाच्या वादात फसल्यानंतर उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांना रोहित शेखरला अखेर आपला मुलगा मानणं भाग पडलं. त्यानंतर आता या ज्येष्छ काँग्रेस नेत्यानं शेखरची आई उज्ज्वला शर्मा यांच्याशी विधिवत विवाह केलाय.
तिवारी यांच्या नजीकच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 89 वर्षीय तिवारी यांनी काल रात्री लखनऊ स्थित आपल्या निवासस्थानी उज्ज्वला यांच्यासोबत विधिवत विवाह केलाय.
उज्ज्वला ही रोहित शेखर याची आई आहे. तिवारी यांनी आपल्याला त्यांचा मुलगा म्हणून स्वीकार करावं, यासाठी शेखरला कोर्टाची पायरी चढावी लागली होती. कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार डीएनए टेस्ट झाल्यानंतर रोहित हा तिवारी यांचाच अंश असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं. त्यानंतर, पहिल्यांदा रोहीतला आपला मुलगा मानण्यास नकार देणाऱ्या तिवारी यांनीही सार्वजनिक स्वरुपात रोहीतला आपला मुलगा मानणं भाग पडलं होतं.
कोर्टातला खटला संपल्यानंतर आणि तिवारींनी शेखरला आपला मुलगा मानल्यानंतर उज्ज्वला या तिवारींचा विरोध डावलून त्यांच्या लखनऊ स्थित घरात राहू लागल्या होत्या.
तिवारी हे तीन वेळा उत्तर प्रदेशचे तर एकदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिलेत. तसंच त्यांनी परदेश मंत्र्याची भूमिकाही सांभाळलीय. 2007 ते 2009 च्या कार्यकाळात आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून कारभार पाहणाऱ्या तिवारींना सेक्स स्कँडलमध्ये फसल्यानंतर आपलं पद सोडावं लागलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.