भारत दौऱ्यासाठी पाक संघ जाहीर, रज्जाक,आफ्रिदीला डच्चू

भारत- पाकिस्तान मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. वन डे संघाची धुरा मिस्बाह-उल-हक याच्याकडे तर टी-२० संघाची धुरा मोहम्मद हाफिज याच्याकडे सोपविण्यात आली आहे

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 11, 2012, 06:44 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
भारत- पाकिस्तान मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. वन डे संघाची धुरा मिस्बाह-उल-हक याच्याकडे तर टी-२० संघाची धुरा मोहम्मद हाफिज याच्याकडे सोपविण्यात आली आहे. वन-डे आणि टी-२० च्या या संघातून अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाक याला डच्चू देण्यात आला आहे. तर शाहिद आफ्रिदीला केवळ टी-२० साठी संघात स्थान देण्यात आले आहे.
सुमारे ५ वर्षांनंतर होणाऱ्या या मालिकेसाठी पाकिस्तान निवड समितीने २०१५चा वर्ल्ड कप ध्यानात ठेवून काही कठोर निर्णय घेतले आहे. त्यामुळे तरुणांना संधी देण्यात आली आहे. यात आफ्रिदी आणि रज्जाक यांना स्थान मिळविण्यात अपयश आले आहे
.
मोहम्मद हाफिज याच्याकडे टी-२०ची जबाबदारी असले तर कामरान अकमल, शोएब मलिक, शाहिद आफ्रिदीवर फलंदाजीची जबाबदारी असणार आहे. तर गोलंदाजीची जबाबदारी उमर गुल आणि फिरकी गोलंदाज सईद अजमल यांच्या खांद्यावर आहे.
तसेच तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी मिस्बाह-उल-हक यांच्याकडे कर्णधारपद सोपवले असून मोहम्मद हाफीज, कामरान अकमल आणि युनूस खान यांच्या अनुभवी खांद्यावर फलंदाजीची जबाबदारी आहे. तर गोलंदाजीची जबाबदारी उमर गुल आणि वहाब रियाज तर फिरकीची जबाबदारी सईद अजमल याच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
२००८ मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर दोन्ही देशातील मालिका बंद करण्यात आल्या होत्या. २२ डिसेंबर रोजी पाकिस्तानची टीम भारतात दाखल होणार पहिला टी-२० सामना २५ डिसेंबरला बंगलौरला खेळण्यात येणार आहे.