www.24taas.com, चेन्नई
अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा एक धावेने पराभव करून दोन टी-२० सामन्यांची मालिका न्यूझीलंडने खिशात घातली. या सामन्यात भारताचा एका धावेने पराभव झाला असला तरी युवराज सिंग याची पुन्हा धडाकेबाज फलंदाजी पाहून गड गेला पण सिंह आल्याचे सुख भारतीय प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसत होते.
न्यूझीलंडच्या १६८ या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने निर्धारित २० षटकात ४ बाद १६६ धावाच करता आल्यामुळे भारताला १ धावेने पराभव पत्कारावा लागला. ३ चेंडूत ६ धावांची गरज असताना युवराज सिंग (३४) बाद झाला. महेंद्रसिंग धोनी (२२) व रोहित शर्मा (४ ) नाबाद राहिले. सेहवाग फीट नसल्याने त्याच्या जागी विराट कोहली गौतम गंभीरसोबत सलामीला आला. त्यांनी चांगली सुरुवात करताना ३ षटकात २६ धावांची सलामी दिली. मात्र त्याचवेळी गौतम गंभीर (३) वेगवान गोलंदाज कायल मिल्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर कोहली (७०), रैना (२७), युवराज (३४) आणि धोनी नाबाद २२ यांनी चांगले योगदान दिल्यानंतरही भारताला १ धावेने पराभव पत्करावा लागला. ९१ धावांची खेळी करणा-या ब्रॅडन मॅक्युलमला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सिंह आला.....
कॅन्सरवर मात करुन वर्षभरानंतर आजच्या सामन्यात युवराजसिंगने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमन केले. त्यामुळे त्याच्या खेळाकडे सर्वांच्या नजरा होत्या. मात्र त्याने आपल्या नेहमीच्या स्टाईलने फलंदाजी सर्वांचे मन जिंकले. त्याने मिल्सला प्रथम स्लिपमधून एक सणसणीत चौकार ठोकला. त्यावेळी त्याची आई शबनम सिंगने टाळ्या वाजवत लाडक्या युवीचे स्वागत केले. त्यानंतर त्याने डॅनियल व्हिटोरीला त्याने जबरदस्त षटकार ठोकला. तसेच आपली खेळातील गुणवत्ता कायम असल्याचे त्याने दाखवून दिले. मात्र तो शेवटच्या षटकात ३४ धावांवर बाद झाला. त्याने २६ चेंडूत दोन षटकार व एक चौकार मारला.