www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सची लढत वानखेडेवर रंगणार आहे. पॉईंट टेबलमध्ये या दोन टीम्समध्ये चुरस आहे. दोन्ही टीम्स घरच्या मैदानावर अनबिटेबल ठरल्या आहेत. त्यामुळे मुंबई आपला घरच्या मैदानावरचा विनिंग रेकॉर्ड कायम राखते की, राजस्थान मुंबईचा रॉयल पराभव करते याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल.
आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये चेन्नई,मुंबई, आणि राजस्थानची टीम पोहचलीय. तर हैदराबाद आणि बंगळुरुमध्ये आता प्ले ऑफमधील चौथी जागा पटकावण्यासाठी चुरस आहे. वानखेडेवर सर्वांचं लक्ष असणार ते पोलार्ड आणि वॉट्सन या धडाकेबाज बॅट्समन्सकडे.
या दोघांपैकी ज्याची बॅट तळपली ती टीम या मॅचमध्ये वरचढ ठरू शकते. त्यामुळे वानखेडेवर पोलार्ड दणकेबाज खेळी करून मुंबईला जिंकून देणार की वॉट्सनचं वादळ राजस्थानचा विजय साकारणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल.
राजस्थान रॉयल्सनं मुंबईवर आधीच्या मुकाबल्यामध्ये मात केली होती. त्यामुळे या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबईची टीम आतूर असेल. दोन्ही टीम्स या सीझनमध्ये आपल्या होम ग्राऊंडवर अनबिटेबल ठरल्या आहेत. मुंबईचा रेकॉर्ड वानखेडवर १०० टक्के आहे. त्यामुळे आपल्या होम ग्राऊंडवर राजस्थानला पराभवाची चव चाखावायला रोहित शर्माची टीम आतूर असेल.
सचिन तेंडुलकरला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीमध्ये दुखापती झाली होती. त्याच्या खेळण्यावर मॅचपूर्वीच निर्णय घेण्यात येणार आहे. तर दुसरीकडे ड्वेन स्मिथनं ओपनरची जबाबदारी चोख पार पाडली आहे. त्यामुळे या लढीतीतही त्याच्याकडून मुंबईला दमदार ओपनिंगची अपेक्षा असेल.
मुंबईची मिडल ऑर्डर स्वप्नवत वाटावी अशाच फॉर्ममध्ये आहे. रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि कायरन पोलार्ड प्रतिस्पर्ध्यांवर हल्लाबोल करण्यास आतूर आहेत. बॉलिंगमध्ये हरभजन सिंग आणि प्रग्यान ओझा स्पिन डिपार्टमेंटमध्ये सुपरहिट ठरले आहेत. तर मिचेल जॉन्सन, लसिथ मलिंगा आणि धवल कुलकर्णी राजस्थानच्या बॅट्समनना रोखण्यास आतूर असतील.
राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली राजस्थानची टीम शानदार कामगिरी करतेय. त्यामुळे मुंबईला या टीमपासून सावध रहाव लागेल. कॅप्टन राहुल द्रविड आणि युवा अजिंक्य रहाणेची ओपनिंग जोडी या सीझनमध्ये कमालीची यशस्वी झाली आहे. तर शेन वॉटसन आणि स्टुअर्ट बिन्नी हे बिग हिटर्स मुंबईच्या बॉलिंगच्या चिंधड्या उडवण्य़ास सज्ज असतील. तर जेम्स फॉकनर आणि सिद्धार्थ त्रिवेदी आपल्या भेदक मा-यानं मुंबईच्या बॅट्समनची दाणादाण उडवून देण्याच्या उद्देशानचं मैदानात उतरतील.
दोन्ही टीम्स या तुल्यबळ आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी ही मॅच एक पर्वणीच ठरणार आहे. त्याचप्रमाणे राहुल द्रविडची अनुभवी कॅप्टन्सी या मॅचमध्ये सरस ठरते की, रोहित शर्माचं नेतृत्व द्रविडवर भारी पडतं याकडेही क्रिकेटप्रेमींच लक्ष असणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.