www.24taas.com, मुंबई
बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या सिक्युरिटी गार्डनं वांद्र्याच्या मच्छिमारांवर केलेली ‘दबंगाई’ चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी ‘सलमान विरोधात गुन्हा दाखल करावा, अन्यथा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढू’ असा इशारा दिलाय.
खारदांडा-चिंबई गावातील जीर्ण झालेली कॉटेजेस पाहीली तर पटकन अशा कॉटेजेसकडे कुणाचं लक्षही जाणार नाही. पण समुद्र किनारी असलेल्या या कॉटेजेसचा मालक सलमान खान असल्याने सध्या ही कॉटेजेस चांगलीच चर्चेत आलीय. इथे पूर्वापार राहात असलेल्या काही मच्छिमारांना या कॉटेजेसचा फटका बसायला लागलाय. या कॉटेजेसजवळ बोटी लावल्याने सलमानच्या सिक्युरिटी गार्डने मच्छिमारांना मारहाण केली तसंच त्यांचं मच्छिमारीचं सामानही जाळल्याचा आरोप होतोय. तसंच सलमानच्या दबावामुळे वारंवार पोलिसांकडे तक्रार देऊनही पोलिसांकडून या प्रकरणात कुठलीही कारवाई करत नाहीत, असा आरोप मच्छिमारांनी केलाय.
भाजप आमदार आशिष शेलार या मच्छिमारांच्या पाठीशी उभे राहिलेत. ‘सलमानविरोधात लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा अन्यथा पोलीस स्थानकावर मोर्चा काढण्यात येईल’, असा थेट इशारा शेलार यांनी दिलाय.
मच्छिमारांना झालेल्या मारहाणीत काहीही तथ्य नसल्याचा दावा सलमानच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. मात्र, स्थानिकांनी आता याबाबतीत आक्रमक पवित्रा आणि त्याला भाजप आमदाराची मिळालेली साथ यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिट अँड रन, काळवीट शिकार प्रकरण अशा अनेक प्रकरणांत कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या सलमानची डोकेदुखी या प्रकरणामुळे आणखी वाढणार हे नक्की.