www.24taas.com झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचं नाव एका रस्त्याला देण्याची मागणी आता पत्नी डिंपल कपाडिया यांनी केलीय.
राजेश खन्ना यांची पत्नी आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी आज लोकसभा राज्यमंत्री राजीव शुक्ला यांची भेट घेतली.
‘राजेश खन्ना हे काँग्रेसचे सदस्य होते. माझी फक्त एव्हढीच विनंती आहे की, कार्टर रोड राजेश खन्ना यांच्या नावाने ओळखला जावा’ अशी मागणी यावेळी डिंपल यांनी केलीय.
याच कार्टर रोडच्या बाजुलाच असणाऱ्या आशिर्वाद बंगल्यात राजेश खन्ना यांनी आपल्या जीवनातील चढ-उतार पाहिले. त्यांनी १८ जुलै २०१२ रोजी अंतिम श्वासही याच बंगल्यात घेतला.
आपल्या चाहत्यांसाठी, त्यांच्या मनोरंजनासाठी आपल्या आयुष्याची पाच दशकं देणारा प्रसिद्ध अभिनेत्यासाठी आपण स्वत: या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं राजीव शुक्ला यांनी यावेळी म्हटलंय. शहरविकास मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर राजेश खन्ना यांचं नाव कार्टर रोडला देण्याविषयी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कार्टर रोडला २००८ साली संगीत दिग्दर्शक नौशाद अली यांचं नाव दिलं गेलं होतं. त्यांच्यानंतर राजेश खन्ना यांचं नाव या रस्त्याला दिलं जावं यासाठी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही भेट घेणार असल्याचं शुक्ला यांनी यावेळी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.