www.24taas.com, मुंबई
‘बालक पालक’ या सिनेमाद्वारे रितेश देशमुख मराठी सिनेमाच्या निर्मितीमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमामुळे मराठी सिनेमा आणखी एक पाऊल पुढे टाकेल, अशी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा हिला आशा आहे.
“हा सिनेमा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, हिच अपेक्षा आहे” असं २५ वर्षीय अभिनेत्री जेनेलिया डिसुझा- देशमुख हिने म्हटलं आहे. १४व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये `बालक पालक` सिनेमाचा स्पेशल शो दाखवण्यात आला. मराठी सिनेमा अधिकाधिक विकसित व्हावा, बहरावा अशी रितेशची इच्छा असल्याचं जेनेलिया म्हणाली.
मुंबई फेस्टिव्हलमध्ये शनिवारी रवी जाधव दिग्दर्शित ‘बालक पालक’ हा सिनेमा ३० नोव्हेंबर रोजी जगभरात रिलीज होणार आहे. “हा सिनेमा जगभरातल्या भारतीयांसाठी आहे. परदेशस्थित मराठी प्रेक्षकही हा सिनेमा एंजॉय करतील.” असं जेनेलियाला वाटतं.
“मराठी सिनेमा हा भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, अशी आमची इच्छा आहे. पुढच्या वर्षी आणखी काही मराठी सिनेमा आम्ही निर्माण करणार आहोत. वयात आलेल्या मुलांना आपल्या अनेक समस्या पालकांकडे मांडण्यात अडचणी येत असतात. याच विषयावर हा सिनेमा बेतलेला आहे.” असं जेनेलिया म्हणाली.