कॅटला शिफॉन साडीत शूट करायचं होतं यशजींना

बॉलिवूडचे ख्यातकीर्त दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या निधनामुळे त्यांची एक इच्छा अपुरी राहिल्याचं फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने सांगितलं. १३ नोव्हेंबर रोजी रिलीज होणाऱ्या ‘जब तक है जान’ चा प्रतिसाद आता यश चोप्रांना पाहायला मिळणार नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 23, 2012, 05:50 PM IST

www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडचे ख्यातकीर्त दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या निधनामुळे त्यांची एक इच्छा अपुरी राहिल्याचं फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने सांगितलं. १३ नोव्हेंबर रोजी रिलीज होणाऱ्या ‘जब तक है जान’ चा प्रतिसाद आता यश चोप्रांना पाहायला मिळणार नाही.
बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याने यशजींच्या एका अपूर्ण राहिलेल्या इच्छेबद्दल खुलासा केला. आपली शेवटची फिल्म ‘जब तक है जान’मधील हिरोइन कतरिना कैफला शिफॉन साडी नेसून चित्रित करण्याचा यशजींचा मानस होता. मात्र त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली.
मनीष मल्होत्रा म्हणाला, की यश चोप्रा आपलं सर्वांत आवडतं लोकेशन स्विस आल्प्स येथे कतरिना कैफवर एक गाणं चित्रित करू इच्छित होते. या गाण्यामध्ये कतरिनाने शिफॉन साडीच नेसावी, असा त्यांचा आग्रह होता. यश चोप्रांना नेहमी असं वाटायचं, की शिफॉन साडी नेसलेली हिरॉइन कॅमेरामध्ये जास्त सुंदर आणि आकर्षक वाटते. या गाण्याच्या शुटिंगच्यावेळी मनीष मल्होत्राने तेथे उपस्थित असावं, अशीही यश चोप्रांची इच्छा होती, असं मनीष मल्होत्रा याने ट्विट केलंय.
कतरिना किंवा अनुष्का एक तरी हिरोइन जब तक है जानमध्ये शिफॉन साडीत दिसणार अस प्रेक्षकांच्या कयास होता. कारण यश चोप्रांच्या चित्रपटात हिरोइन शिफॉन साडी नेसतेच. मात्र यावेळी प्रेक्षकांचीही ही इच्छा अपूर्ण राहाणार आहे.