पूनम नार्वेकर, झी मीडिया, मुंबई : SUSHMITA SEN ......MISS INDIA …YOU ARE THE NEW MISS UNIVERSE 1994 !! ....स्पर्धेच्या अंतिम निकालाची घोषणा झाली आणि तमाम भारतीयांनी एकच जल्लोष
केला. 1994 मध्ये फिलिपीन्सच्या मनीलामध्ये रंगलेला दिमाखदार सोहळा होता तो ...१९ वर्षांच्या सुष्मिता सेननं इतिहास रचला होता...भारतासाठी “मिस युनिव्हर्स”चा मुकुट जिंकणारी ती पहिली भारतीय सुंदरी ठरली होती.....मुकूट जिंकल्यानंतर तिच्या चेह-यावरचे भाव माईलस्टोन ठरले....आज २३ वर्षांनंतर पुन्हा ही स्पर्धा फिलिपीन्सच्या मनिलामध्ये रंगली ....तेच स्टेज ...तोच थरार....आणि जजच्या भूमिकेत सुष्मिता सेन..एक स्पर्धक ते जज ....२३ वर्षांच्या प्रवासाचं एक वर्तूळ ख-या अर्थाने पूर्ण झालं!
सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर अर्थातच सुष्मितासाठी बॉलिवूडची दारे खुली झाली. दस्तक या चित्रपटापासून करिअरची सुरुवात करणा-या सुष्मिताने २३ वर्षांच्या तिच्या कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिले. त्याच वर्षी विश्वसुंदरीचा मुकुट जिंकलेल्या ऐश्वर्या रायशी तिची तुलना प्रत्येक पातळीवर झाली...अर्थात मग स्पर्धा ही आलीच..पण सुष्मिता ही सर्वार्थाने वेगळ्या धाटणीची... बोल्ड आणि ब्युटीफूल... समाजाची पर्वा न करता कोणताही मुखवटा न चढवता बिनधास्त जगणा-या सुष्मिताने घेतलेले अनेक निर्णय तिच्या करिअरसाठी घातक ठरले....विक्रम भटसोबतचे तिचं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणं आणि त्यानंतर संजय नारंग, रणदीप हुडा, मानव मेनन, रितीक भसीन अशी तिची ब्वॉयफ्रेंड लिस्ट....पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमशीही तिचं नाव जोडलं गेल. अर्थात या गोष्टींमध्ये गुंतल्याने बॉलिवूडच्या स्पर्धेतून ती काहीशी मागे पडली. पण आपण घेतलेले निर्णय हे संपूर्णपणे आपली जबाबदारी मानून ती परिणामांनाही तेवढ्याच सक्षमपणे सामोरी गेली.
आपल्या कारकिर्दीत विविध भूमिका सुष्मिताने केल्या ...टीपिकल बॉलिवूड रोल तिने अनेक चित्रपटातून केले. ‘मै हू ना’ चित्रपटातील सेक्सी टीचर तीने उत्तम रंगवली. ‘फिलहाल’, ‘सिर्फ तुम’ , बिवी नंबर वन’ या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले. आयटमसॉंगदेखील हिट झाली. पण समय, वास्तुशास्त्र, आंखे , चिंगारीसारख्या चित्रपटातील भक्कम भूमिकांचे विशेष कौतुक झालं, कारण सुष्मिताच्या व्यक्तीमत्वाला साजेशा या भक्कम आणि वेगळ्या भूमिका होत्या. सुष्मिताने त्या तेवढ्याच ताकदीने पेलल्या. आज ती या अभिनयाच्या स्पर्धेत कुठेही नसली तरी त्यापलिकडे जाऊन तिने आपला ठसा उमटवला आहे. स्पष्टच बोलायचं तर ऐश्वर्या राय पेक्षाही एक पाऊल पुढेच!
महिला असणं ही देवाने दिलेली सुंदर देणगी आहे आणि प्रत्येकाने तिचं कौतुक करायला पाहिजे ..असं सांगणारी सुष्मिता स्त्रीत्वाचा सन्मान कऱण्यासाठी अनेकदा पुढे आलीय.
“I am She “ च्या माध्यमातून भारत सौंदर्यस्पर्धा भरवून त्यांना जागतिक स्तरावर प्रतिनिधीत्व कऱण्यासाठी पाठवण्याची फ्रॅन्चायझी तिने घेतली. सामान्य घरातील मुलींना या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा आत्मविश्वास तिने दिला, त्यांना त्यादृष्टीने घडवण्यासाठी तिने मेहनत घेतली. “ I Am “ या तिच्या स्वसंसेवी संस्थेमार्फत अनेक लहान मुलींना तिने शिक्षण दिलंय तर दुर्धर आजाराने ग्रस्त मुलींवर मोफत उपचार केले.
खरं तर सौंदर्य स्पर्धेत दिली जाणारी उत्तरं ही केवळ दिखावा म्हणून दिली जातात असा समज आहे. पण सुष्मिताने वयाच्या १९ व्या वर्षी सौंदर्य स्पर्धेत दिलेली उत्तरं ती ख-या अर्थाने जगली आणि जगतेय... वयाच्या २५ व्या वर्षी “ सिंगल मदर” होण्याचा तिने घेतलेला धाडसी निर्णय हा त्याचाच एक भाग. तिच्या या निर्णयाला समाजातून विरोधही झाला पण तिची पर्वा न करता कोर्ट कचे-या करत तिने ही लढाई जिंकली ...आज ती रेनी आणि अलिसा या दोन मुलींची आई आहे....गेली १७ वर्षे ती “आईपण “जगतेय...आणि मुलींनाही तितक्याच सक्षमपणे उभं राहायला शिकवतेय..
अडवेंचर माझ्या आत भिनलेंल आहे म्हणून मी ते एन्जॉय करते ..असं वयाच्या १९ व्या वर्षी स्पर्धेतील प्रश्नोत्तरदरम्यान ठासून सांगणारी सुष्मिता म्हणूनच ख-या अर्थाने बोल्ड एण्ड ब्युटीफुल ठरते...