असा 'सच्चा कार्यकर्ता' प्रत्येक पक्षात असावा...

हा ब्लॉग एका सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्यावर असला, तरी त्याचं कार्य, सर्व पक्ष आणि राजकारणी आणि कार्यकर्त्यांसाठी काहीतरी शिकवून जाणारं आहे, कारण धातुची पदकं बनवून छातीवर टांगली, तरी जागा अपूर्ण पडेल एवढी पदं भोगतात, सत्ता गेल्यावर स्वार्थासाठी राजकारणी पक्ष सोडतात, कारण पदं, कंत्राटं याची हौस त्यांचा जन्म गेला तरी भागत नाही. 

Updated: Aug 10, 2015, 10:34 PM IST
असा 'सच्चा कार्यकर्ता' प्रत्येक पक्षात असावा... title=

मुंबई : (जयवंत पाटील, मुंबई ) हा ब्लॉग एका सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्यावर असला, तरी त्याचं कार्य, सर्व पक्ष आणि राजकारणी आणि कार्यकर्त्यांसाठी काहीतरी शिकवून जाणारं आहे, कारण धातुची पदकं बनवून छातीवर टांगली, तरी जागा अपूर्ण पडेल एवढी पदं भोगतात, सत्ता गेल्यावर स्वार्थासाठी राजकारणी पक्ष सोडतात, कारण पदं, कंत्राटं याची हौस त्यांचा जन्म गेला तरी भागत नाही. 

असा निष्ठावान आता कुठे सापडणार...
राजकारणात हौसे, गवसे, नवसे यांच्यापेक्षा दुखावलेले, सुखावलेले, निर्ढावलेले आणखी काय काय सर्वच असतात, पण एक निष्ठावान मोजून सापडत नाही, पक्ष कोणताही असू द्या.

एक होता 'सच्चा कार्यकर्ता'
मनोहर पाटील हा भाजपचा कार्यकर्ता होता, पण प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या पक्षावर पक्षाच्या भूमिकेवर किती प्रेम करावं, शेवटपर्यंत निष्ठावान कसं रहावं, हे त्याच्याकडून शिकण्यासारखं होतं, मनोहर  आज जग सोडून गेल्याचं व्हॉटस अॅपवर वाचलं, यानंतर मनोहर सारख्या कार्य़कर्त्याचं कार्य समोर आलं त्यानिमित्ताने लिहलेला हा लेख...

शेवटपर्यंत एकच पक्षात
महाराष्ट्रात पहिल्यांदा युतीची सत्ता आली, मनोहर सारखे २०-२२ वर्षाच्या कार्यकर्त्यांनी तेव्हा पहिल्यांदा तालुक्यात भाजपासाठी आमदारपद खेचून आणलं होतं. तेव्हाच्या तरूण कार्यकर्त्यांच्या मुशीत वाढलेला हा कार्यकर्ता, भाजपचे डॉ. बी.एस.पाटील हे (जळगाव) अमळनेरचे सलग १५ वर्ष आमदार होते. 

आपला आमदार असला, सत्ता असली की बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर  माज दिसतो, तो सर्वसामान्यांना लगेच ओळखू येतो. मात्र मनोहर याने नेहमीच सर्वसामान्यांची कामं केली. पद काय असतं, त्याचा हव्यास त्याच्या बोलण्यात कधीच जाणवला नाही.

राजकारण बदललं पण 'बोली' मानसन्मानाचीच होती
तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष या पदांचा त्याला कधीच हव्यास नव्हता, एवढंच नाही, अमळनेर भाजपात परिस्थितीनुसार बडे नेते वेगळे पडले, तरी कुणाबद्दलही तो कधीच वाईट बोलतांना दिसला नाही.

कारण त्याचं प्रेम आणि निष्ठा ही पक्षावर असावी, त्याने कधीच पक्ष सोडला नाही, सोडून जाणाऱ्या नेत्याच्या मागे काहीही बोलला नाही, एवढंच ते वेगळे लढवतायत, आता पाहू तिकीट कुणाला मिळणार?..

विरोधकांच्या मागेही सन्मानाने बोलला
तो विरोधक असलेला उमेदवार, नेत्यांविषयीही टीका करत नव्हता, आमचे नेते असे तसे, फार मोठे, त्यांची ओळख असं देखील कधीच नाही. आपण आबांना सांगू, बापूंना सांगू, काम करूया नियमात असेल तर नक्की होईल. हे बोलणं त्याचं नेहमीच असायचं.

'पाटील' होता पण....
मनोहर पाटील याची माझ्याशी पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा हा 'पाटील' पद मिळवण्यासाठी राजकारणात असावा. हा माझा गैरसमज होता, कारण पाटील आडनाव असलं, तरी मनोहर गुजर समाजाचा होता, तालुक्यात मराठा समाजाचा राजकारणात दबदबा, दुसऱ्या अर्थाने त्यांचीच पदांसाठी मारामारी सुरू असताना, मनोहरला ही पदं कोसो दूर होती. शिकलेला असूनही कधीच नोकरीसाठी त्याने कुणाकडे 'शब्द' वाया घालवला नाही, किंवा 'किंमत' करून घेतली नाही.

दलाली, लूट केली नाही...
मनोहरचा आणखी एक गुण, तो राजकारणी आणि आमदारांच्या पैशांवर कधीच जगला नाही, एक रूपया खर्च लागला असेल तर शंभर रूपये त्याने कधीच सांगितले नाहीत, त्याने नेहमीच पदरमोड केली, निवडणुका लागल्यावर आपण ज्यांना घरून भाकरी बांधून प्रचाराला येणारे कार्यकर्ते म्हणतो, त्यातला तो एक होता.

मनोहरला जन्मापासून किडनीचा आजार होता, आज ना उद्या आपल्याला हे सोडावं लागणार आहे, याची कल्पना त्याला असावी, म्हणून त्याने लग्न न करण्याचा निर्धार शेवटपर्यंत कायम ठेवला.

अभ्यासू कार्यकर्ता...
तो भेटायचा तेव्हा मनापासून आनंद होत होता, कारण एक चांगली खरीखुरी माहिती तो तालुक्याच्या राजकारणाबद्दल देत होता, बदल्यात तो राष्ट्रीय, राज्याच्या राजकारणावर भरभरून बोलायचा, प्रश्न विचारायचा, प्रश्नात विकास कसा होईल ही चिंता जरूर असायची, असा निष्ठावंत मित्र सोडून गेल्याने नक्कीच, काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.