लेणी पाहण्यासाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांची पुन्हा छेडछाड

पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत परदेशी पर्यटक अजूनही सुरक्षित नसल्याचाच प्रकार उघड झालाय. नुकतंच एका परदेशी जोडप्याला एकांतात गाठून त्यांना अश्लील हावभाव करत त्यांच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 5, 2013, 06:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत परदेशी पर्यटक अजूनही सुरक्षित नसल्याचाच प्रकार उघड झालाय. नुकतंच एका परदेशी जोडप्याला एकांतात गाठून त्यांना अश्लील हावभाव करत त्यांच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला.
औरंगाबादच्या प्रसिद्ध वेरुळ लेणी पाहण्यासाठी आलेलं एक परदेशी पर्यटक जोडपं इथं आलं होतं. यावेळी इथं मध्यप्रदेशातूनही काही युवक पर्यटक म्हणून दाखल झाले होते. या युवकांनी परदेशी जोडप्याला एकांतात गाठून त्यांच्यासोबत जबरदस्तीने फोटो काढण्याचा प्रयत्न केला. तसंच अश्लील हावभाव करत त्यांच्या छेडछाडीचा प्रयत्न झाल्याचीही माहिती मिळतेय.
पण, स्थानिक पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत यातील १२ मुलांना ताब्यात घेतलं. मात्र, या मुलांच्या त्रासानं घाबरलेल्या विदेशी पर्यटक जोडप्यानं त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. त्यांनी पोलिसांकडे कुठलीही तक्रार दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी या आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना कोर्टानं क्षुल्लक आर्थिक दंड ठोठावत सोडून दिलं.

मात्र, यापद्धतीने जागतिक वारसा असलेल्या ठिकाणी पर्यटक सुरक्षित नसल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. काही दिवसांआधी अजिंठ्यातही अशाच पद्धतीने पर्यटकांची छेडछाड झाल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पर्यटकांची काळजी घेतली जाईल असे सांगितलं होतं. मात्र, अजूनही परदेशी पर्यटकांना त्रास होत असल्याचंच या घटनेनं समोर येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.