www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
मैदानी धावपट्टीवर असो की बुद्धिबळाच्या चौकटीवर नाशिकच्या लहान वयातल्या खेळाडूंनी आपली छाप सातासमुद्रापार सोडलीय. असं असताना आता अँन्ड्रॉईडच्या मैदानी खेळात नाशिकच्या मानस गाजरेनं भल्याभल्यांना मात दिलीय. ‘दहीहंडी’ हा क्लॉक डाऊन गेम तयार करून त्यानं गुगलच्या पहिल्या दहाच्या लिस्टमध्ये पुन्हा एकदा स्थान मिळवलंय.
जगभरात सध्या अँन्ड्रॉईड मोबाईल्सचा बोलबाला आहे. त्या फोनमधल्या विविध गेम्सनी जगभरातल्या लोकांना पछाडलंय. नाशिकच्या मानस गाजरेच्या गेमनंही असंच भल्याभल्यांना वेड लावलंय. त्या गेमचं नाव आहे दहीहंडी. मुंबईकरांचा हा आवडता सण मानसनं अँन्ड्रॉईडच्या प्लॅटफॉर्मवर आणलाय. विशेष म्हणजे गुगलच्या फ्री डाऊनलोड लिस्टमध्ये या गेमनं नववा क्रमांक मिळवलाय. पुणे ढोलचं लोकप्रिय संगीत देत त्यानं सातासमुद्रापार ही हंडी लोकप्रिय केलीय. दीड लाख लोकांनी त्याचा हा गेम डाऊनलोड करत पसंती दिलीय.
सध्याचा लोकप्रिय गेम ‘अँग्री बर्डस’च्या धर्तीवर त्यानं पुढचं पाऊल टाकलंय. भारतीय गलोलचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करत त्यानं खेळ आणखी रंजक केलाय. भारतीय मंदिर, दही हंड्या वापरत त्यानं भारताची संस्कृतीसुद्धा सातासमुद्रापार पोहोचवलीय.
यापूर्वी मानसच्या गेमनं ‘बलून गेम्स’च्या लिस्टमध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. तब्बल दहा दिवस त्यानं अँगी बर्ड आणि प्रिन्स ऑफ पर्शियाला मागे टाकलं होतं. आता मानस टेम्पल रन गेमला मात देण्याच्या तयारीत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.