शरद पवार दैवत, त्यांचा निर्णय मान्यः अजित दादा

शरद पवार हे माझे दैवत असून ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, असे आज अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र राजीनाम्याबद्दल त्यांनी कोणतंही वक्तव्य न केल्याने अजूनही सस्पेन्स कायम आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 28, 2012, 06:23 PM IST

WWW.24taas.com, मुंबई
शरद पवार हे माझे दैवत असून ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, असे आज अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र राजीनाम्याबद्दल त्यांनी कोणतंही वक्तव्य न केल्याने अजूनही सस्पेन्स कायम आहे.
पाटबंधारे खात्यासंदर्भात माझ्या विरोधात जे आरोप झाले ते एका षड्यंत्राचा भाग आहे, हे षड्यंत्र करणारी व्यक्ती कोण आहे हे मला माहित असल्याचे अजित पवार यांनी सांगितले, परंतु कोणत्याही व्यक्तीचं नाव त्यांनी घेतलं नाही. पवार साहेब माझे दैवत आहे. ते जो काही निर्णय घेतील, तो माझ्यासाठी अंतीम असेल, तसेच माझा प्रत्येक प्रयत्न हा पक्ष वाढीसाठी असेल, असेही अजित पवार यांनी आज विधीमंडळात राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर बोलताना सांगितले.
राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईत दाखल झाले, असून दिवसभर जोर-बैठकाचा सिलसिला सुरू होता. सुमारे दोन तास शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली, त्यानंतर यशवंतराव सभागृहात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली, आता सध्या विधीमंडळात सर्व आमदारांसह शरद पवार बैठक संपली असून आता काहीवेळात या राजीनाम्या नाट्यावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार आज मुंबईत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अजित पवार, प्रफुल पटेल, मधुकर पिचड यांच्यासह सुमारे १ तास ५० मिनिटे बैठक घेतली. तसेच ज्येष्ठ नेत्यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. या दोन्ही बैठकीनंतर आता विधीमंडळात शरद पवारांच्या उपस्थितीत अजून एक बैठक सुरू असून त्यात शरद पवार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
या बैठकीत अजित पवार यांचा राजीनामा स्वीकारणाचा निर्णय होऊ शकतो. तसे शरद पवार जाहीर करू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.