www.24taas.com, मुंबई
अजित दादा तुम्ही उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागे घ्या अशी राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांनी मागणी केली आहे. अजितदादांच्या शक्तिप्रदर्शनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या बैठकीत ठराव मांडण्यात आला आहे. पवारांनी आमदारांच्या भावना जाणून घ्यावात अशी विनंती अजित पवार समर्थक आमदारांनी केली.
मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी झी 24 तास शी बोलताना सांगितलं, की आजची बैठक ही राजकीय कारणास्तव होत नसून केवळ दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी घेण्यात येत आहे. शरद पवार मुंबईत दाखल झाल्याशिवाय या संदर्भात कुठलीही चर्चा होणार नाही, असंही पिचड म्हणाले
राष्ट्रवादीचे सर्व आमदार विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी विधान भवनात दाखल झाले आहेत. त्यांनी अजित पवारांच्या समर्थ जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, अजित पवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा आहे. या बैठकीला अजित पवारही उपस्थित आहेत.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बाबासाहेब कुपेकर यांचा शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे. मात्र शरद पवारांनी आमदारांच्या भावना जाणून घ्याव्यात असा एक ओळीचा प्रस्ताव पारित करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळं अजित पवारांनी समर्थक आमदारांमार्फत दबावाचे तंत्र सुरू केले असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीचे सर्व आमदार आता अजितदादांच्या समर्थनात एकवटले आहेत. प्रदेशाध्य़क्ष मधुकर पिचड यांच्या निवास्थानी होणा-या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी सर्व आमदार बबनराव पाचपुते यांच्या घरी जमले आहेत. त्यामुळं बैठकीपूर्वी आमदारांची रणनिती ठरत आहे. यापूर्वीही अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी पाचपुतेंच्याच घरी आमदारांनी खलबते केली होती.
महाराष्ट्रात नवा उपमुख्य़मंत्री नाही असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. उपमुख्यमंत्रिपदी आर.आर.पाटील की जयंत पाटील यांची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नवा उपमुख्यमंत्री नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी राजीनाम्याची तयारी दर्शवलीय. काही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सोपवल्याची माहिती झी 24 तासला दिलीय. तर ज्येष्ठ आमदारांनी मात्र राजीनाम्याची तयारी दर्शवल्याचं सांगितलंय. त्यामुळं राष्ट्रवादीचे काँग्रेसवर दबावतंत्र सुरूच असल्याचं चित्र दिसतंय.