दादा-बाबांच्यामध्ये दरी, फोन घेण्यास टाळाटाळ

अजित पवार हे गेल्या आठ दिवसांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संपर्कातच नव्हते,अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आठ दिवसांत अजितदादांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा फोनच उचलला नव्हताही अशी माहिती आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 26, 2012, 01:32 PM IST

www.24taas.com,मुंबई
अजित पवार हे गेल्या आठ दिवसांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संपर्कातच नव्हते,अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आठ दिवसांत अजितदादांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा फोनच उचलला नव्हताही अशी माहिती आहे.
अजित पवार गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. अजित पवार यांचा राजीनामा मिळाल्यानंतरही पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना फोन केला होता. अजित पवारांनी नंतर फोन करतो असं सांगून त्यांचा फोन ठेवून दिला, असी माहिती आता पुढे येऊ लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी राजीनाम्याची तयारी दर्शवलीय. काही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सोपवल्याची माहिती झी २४ तासला दिलीय. तर ज्येष्ठ आमदारांनी मात्र राजीनाम्याची तयारी दर्शवल्याचं सांगितलंय. त्यामुळं राष्ट्रवादीचे काँग्रेसवर दबावतंत्र सुरूच असल्याचं चित्र दिसतंय.

अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीसोबत काँग्रेसमध्येही खल सुरु आहे. मुख्यमंत्र्यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरु असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलीय. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा सुरु असल्याचं त्यांनी सांगितलंय.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मुंबईत आल्यानंतरच घेण्यात येणार आहे. शरद पवार शुक्रवारी मुंबईत आल्यानंतरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी दिलीय.