www.24taas.com, लंडन
युवराजच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. युवराज सिंग ९ एप्रिल रोजी भारतात परतणार आहे. मायदेशी परतल्यावर युवराज ११ एप्रिलला पत्रकार परिषद घेणार आहे. अमेरिकेतील टेक्सास येथे युवराज याच्या कँसरवर गेले काही महिने उपचार चालू होते. केमोथेरपीच्या ३ आवर्तनांनंतर १८ मार्च रोजी युवीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. उपचारांदरम्यान युवराजला प्रचंड अशक्तपणा आला होता. केमोथेरपीमुळे युवीचे सगळे केसही गळाले.
सध्या युवराज लंडनला आपल्या मित्राच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकरने या ठिकाणी येऊन युवीची भेट घेतली होती. फेब्रुवारीपासून अमेरिकेत उपचार करवून घेत असलेला युवराज मे-जून महिन्यामध्ये पुन्हा क्रिकेट मैदानावर खेळण्यासाठी सिद्ध होणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये युवराजने कसोटी मालिकेत वेस्ट इंडिज विरुद्ध क्रिकेट खेळल्यानंतर पुन्हा मैदानावर उतरलेला नाही.
युवराज पुन्हा मैदानावर खेळण्यासाठी केव्हा येईल यांचीच त्याचे चाहते वाट पाहत आहेत. युवराजने ३७ टेस्टमध्ये ३४.८० च्या स्ट्राईक रेटने १७७५ रन काढले आहेत. तर २७४ वनडे मध्ये ३७.६२ च्या स्ट्राईक रेटने ८०५१ रन काढले आहेत. तर २३ टी-२० मॅचमध्ये त्याच्या नावावर ५६७ रन केले आहेत.