सुवर्णकन्यांना अजूनही बक्षिसाची रक्कम नाहीच

भारताच्या महिला टीमनं कबड्डीचा पहिला-वहिला वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. त्या तीन खेळाडूंचा सत्कार करून त्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत केली होती. मात्र, तीन महिन्यानंतरही खेळाडूंना बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही.

Updated: May 22, 2012, 03:54 PM IST

नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणे

 

सरकारकडून खेळाडूंची होणारी उपेक्षा नवी नाही. राज्य सरकारच्या अशाच एका उपेक्षेचं आणखी एक उदाहरण पुण्यात समोर आलंय. भारताच्या महिला टीमनं कबड्डीचा पहिला-वहिला वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. त्या तीन खेळाडूंचा सत्कार करून त्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत केली होती. मात्र, तीन महिन्यानंतरही खेळाडूंना बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही.

 

सुवर्णा बारटक्के, अभिलाषा म्हात्रे आणि दीपिका जोसेफ... कबड्डीचा पहिला-वहिला वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये या तिघींचा मोलाचा वाटा होता. वर्ल्डकप जिंकल्यावर मुख्यमंत्र्यांनी या तिघींना बोलावून सत्कार केला. त्याचबरोबर प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणाही केली. आता मात्र, मुख्यमंत्र्यांचं हे आश्वासन हवेतच विरतंय का, असा प्रश्न पडलाय. तीन महिने झाले तरी बक्षिसाची रक्कम अजून मिळालेली नाही. आणि ती देण्याची कोणतीही हालचाल सरकारी पातळीवर दिसत नाही.

 

सरकारची ही उपेक्षा दीपिकाला नवी नाही. कॉमनवेल्थ आणि नॅशनल गेम्समधल्या कामगिरीसाठी राज्य सरकार आणि महापालिकेनं अनेक घोषणा केल्या होत्या. मात्र, ही बक्षिसं मिळण्यासाठी दीड वर्षांहून जास्त वाट पहावी लागली होती. महापालिकेनं जाहीर केलेली बक्षिसाची रक्कम आणि घराचं आश्वासन तर अजूनही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे दीपिका अजूनही केळेवाडीत झोपडपट्टीतल्या घरातच राहतेय.

 

दीपिकाचं शिक्षण आणि खेळाचा सराव या सगळ्याचा भार तिच्या आईवरच पडतोय. या परिस्थितीतूनही दीपिका आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली. छत्रपती पुरस्कारापासून अनेक पुरस्कार, पदकं आणि ट्रॉफी तिला मिळाल्या आहेत. सरकारच्या बक्षीसाच्या रक्कमेतून तिला घऱ घ्यायचं होतं. मात्र, पुरस्काराची रक्कमच मिळालेली नाही, त्यामुळे दीपिकाचं घराचं स्वप्नही पूर्ण झालेलं नाही.