www.24taas.com, सातारा
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यात पोचणार आहे. साताऱ्यातल्या लोणंदमध्ये पालखी आज रात्री विश्रांती घेईल. संपूर्ण लोणंद नगरी माऊलीच्या स्वागतासाठी सज्ज झालीये. माऊलींच्या पादुकांना नीरा नदीतील दत्त घाटावर गंगा स्नान घातल्यावर आज दुपारी तीन वाजता पालखी सोहळा खंडाळा तालुक्यातील पाडेगाव इथं सातारा जिल्ह्याच्या सीमेवर प्रवेश करणार आहे.
तर दुसरीकडे वरवंडहून निघालेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोमवारी मुक्काम गवळ्याची उंडवडी इथं होता. या दरम्यान, तुकाराम महाराजांच्या पालखीनं छोटेखानी रोटी घाट पार केला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ज्याप्रमाणे दिवे घाटाचा टप्पा महत्वाचा असतो, त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात रोटी घाटाचा टप्पा विशेष महत्वाचा सोहळा मानला जातो. आज तुकोबांची पालखी बारामती इथं मुक्कामाला असेल.
.