अण्णा मौनव्रत सोडणार

ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे गेल्या काही दिवसांपासून सुरू केले मौनव्रत सोडणार असल्याची माहिती अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगवर दिली आहे.

Updated: Oct 31, 2011, 11:40 AM IST

झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी

ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे गेल्या काही दिवसांपासून सुरू केले मौनव्रत सोडणार असल्याची माहिती अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगवर दिली आहे.

 

अण्णांना लोकांशी बोलण्याची इच्छा अनावर झाल्यामुळे ते आपले मौन सोडणार असल्याचे या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. यानंतर लोकांशी संवाद साधण्यासाठी अण्णा देशभर दौरा करणार असल्याची माहिती यात देण्यात आली आहे.

 

ब्लॉगमधील मजकूर पुढील प्रमाणे

माझ्या मनातलं तुमच्यासाठी !

राळेगणसिद्धी

३० ऑक्टोबर २०११

माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो ,
नमस्कार.

माझे मौन सोडण्याचे विचार सुरु झालेत. येणाऱ्या ३ ते ४ दिवसात मौन सोडण्याचा विचार करतो आहे कारण माझ्या ब्लॉगवरून ज्या अर्थी कोट्यावधी जनता  वाचक झाली आहे त्या अर्थी अधिक मौन न बाळगता त्यांच्याशी खुलेआम चर्चा करणे मला अधिक महत्त्वाच वाटतं.

देशभर दौरे करून जे तरूण-तरुणी, शाळेतील मुले, शेतकरी, कामगार वर्ग, स्त्रिया व पुरुष यांनी ह्या आंदोलनाला जगभर साथ देऊन रस्त्यावर येऊन आंदोलने केली, प्रसंगी जेल मध्ये गेले, संकटांना सामोरे गेले. त्या सर्वांना पाहायची आणि त्यांच्याशी बोलण्याची माझीही तीव्र इच्छा झालेली आहे. त्यामुळे लवकरच मौन सोडून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी विविध राज्यांचे दौरे मी आता आयोजित करत आहे.

अशा दौऱ्यांमुळे मागील आंदोलनामध्ये ज्याप्रमाणे मला जनतेमधून खास करून युवक-युवतींकडून जी उर्जा प्राप्त झाली होती तशीच उर्जा मला मिळत राहिल व या उर्जेच्या बळावर मी ‘जनलोकपाल’ कायदा होईपर्यंत व नंतर ‘Right to Reject’ (नकार देण्याचा अधिकार) and ‘Right to Recall’ (परत बोलावण्याचा अधिकार) होईपर्यंत लढत पुढे जाणार आहे.

देशातील तुम्ही सर्वजण थेट माझ्या बरोबर असालच!

जय हिंद! इन्कलाब जिंदाबाद! वन्दे मातरम! भारत माता की जय!

कि. बा. हजारे (अण्णा)