www.24taas.com, नवी मुंबई
नवी मुंबई परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या तात्पुरत्या घरांवरून सिडकोनं दुटप्पी भुमिका घेतली आहे. गरजेपोटी बांधलेली ही घरं नियमित करण्यासाठी सिडकोनं एकीकडे हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे याच घरांना पाडण्याच्या नोटीसाही देण्यात आल्या आहेत. सिडकोच्या या दुटप्पी भूमिकेमुळं रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नवी मुंबईतील गावांमध्य़े ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला. यासाठी गावांमधुन गरजेपोटी बांधण्यात आलेली घराची कागदपत्रं मागवण्यातही आली. परंतु त्यानंतर सिडकोने घुमजाव केलं. सुरुवातीला घर नियमित करणार असं आश्वासन देणाऱ्या सिडकोने नंतर मात्र बांधकाम नियमित नाही, अस सांगत घरे तोडण्याचे आदेश दिले आहेत. सानपाडा ग्रामस्थांना सिडकोच्या या नोटीसा मिळल्यावर त्यानी निषेध व्यक्त करत सिडकोवर हल्लाबोल चढवला.
एकीकडे प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित होणार असे गाजर दाखवून दुसरीकडे घर तोडण्याची नोटीस देऊन प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करण्यात येतेय. यावरुन राजकारण खेळलं जात असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या घरावर हातोडा बसणार आहे, पण ना सिडको काही बोलायला तयार आहे ना नेतेमंडळी. या साऱ्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी आता सिडकोविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.