www.24taas.com, ठाणे
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरेंसमोर लोटांगण घातलं असल्याची जहरी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्याच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला उघड पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराल पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीचा पराभव जितेंद्र आव्हाडांच्या जिव्हारी लागला आहे हेच यातून दिसून येतं.
यासंबंधी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितलं की, आम्ही संख्याबळ जमवण्यात कमी पडलो. अखेरीस राजकारणात संख्याबळाला महत्व असतं, मेजॉरिटीली महत्व असतं. आम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे दोन दूर गेलेली आणि विभाजित झालेली कुटुंब एकत्र आली, हे काय कमी आहे की अशी तिरकस प्रतिक्रियाही आव्हाड यांनी व्यक्त केली. आमच्या प्रयत्नांमुळे दोन कुटुंबांमधला दुरावा संपला म्हणजे काही तर चांगले घडलं असं आव्हाड म्हणाले.
संख्याबळाबाबत आव्हाड म्हणाले की आमच्या दोन नगरसेविका गायब झाल्याने सेनेला संख्याबळ गाठता आलं. आणि राज ठाकरेंचा निर्णय झाल्यानंतर आमच्या नगरसेविका परतल्या. यावरुन आम्ही काय समजायचं ते समजलो. आमच्या नगरसेविकांचे फोन आले की आम्हाला परत यायचं आहे, आम्ही महाबळेश्वरला आहोता, हेलिकॉप्टर पाठवा. आमच्या दोन नगरसेविका गायब झाल्या, तर आम्ही कुठे गजहब माजवला.
ठाण्यात घृणास्पद राजकारणाने नागरिकांना झालेल्या मनस्तापाबद्दल विचारलं असतान ते म्हणाले की बसपाचे दोन नगरसेवक गायब झाले तर ते दलित समाजातले असल्यामुळे त्याविरोधात कुणी काही बोलायचे नाही. तसंच आमच्या दोन नगरसेविका गायब झाल्या तर त्याविरोधात आम्ही मीडिया जाऊन प्रतिक्रिया दिल्या नाहीत. तसंच आम्ही ठाणे बंद केले नाही किंवा तोडफोड केली नाही. माझ्या बायकोने गोळ्या खाल्या म्हणून केमिस्टला मारहाण करायची का असा उलट सवालच आव्हाडांनी करत सेना-भाजपला शालजोडीतले हाणले.
ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीरपणे शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे सेना-भाजप युतीचा महापौर होणार आहे हे निश्चित झालं आहे. गेले दोन-तीन दिवस भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे गायब झाल्या होत्या. त्यावरुन सेना-भाजपने ठाणे बंद आणि महामोर्चा तसंच न्यायालयीन लढाई आणि हिंसक मार्गांचाही अवलंब केला त्या सुहासिनी लोखंडे अखेर सभागृहात अवतरल्या आहेत.