प्रणव मुखर्जी आज देणार राजीनामा...

अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस वर्किंग कमिटीतून त्यांना भावूक निरोप देण्यात आला.

Updated: Jun 26, 2012, 08:03 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस वर्किंग कमिटीतून त्यांना भावूक निरोप देण्यात आला. सोनियांनी त्यांच्या चार दशकातील योगदानाची स्तुती केली. यावर पक्षासाठी मी दिले, त्याहून अधिक पक्षानं मला दिल्याचं म्हणत प्रणवदांनी सर्वांचे आभार मानले.

 

एक नजर प्रणवदांच्या राजकीय प्रवासावर...

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून ते आजतागायत सरकारमध्ये मंत्री असताना प्रणवदांचं नाव आघाडीचे मंत्री म्हणून घेतलं जातं. पंतप्रधानानंतर सगळ्यात ज्येष्ठ मंत्री म्हणून त्यांची गणना होते. वडिलांकडून राजकारणांचे धडे घेतलेल्या प्रणवदांनी देशाच्या सर्वोच्च पदावर आरुढ होणं ही आता केवळ औपचारिकता राहिलीय.

 

 

सत्तरच्या दशकात इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांची जी फौज राजकारणात सक्रीय झाली, त्यात बंगालमधून प्रणव मुखर्जी यांचं नाव सामील झालं.  स्वातंत्र्यसैनिक असलेल्या  वडिल के. के. मुखर्जी यांच्यापासूनच प्रणवदांना राजकारणांचे धडे मिळाले होते. त्यांच्या निधनानंतर बंगाल काँग्रेसच्या राजकारणात इंदिरा गांधींनी प्रणवदांना पुढं केलं. १९६९ मध्ये ते राज्यसभा सदस्य बनले. वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी संसद सदस्यत्व स्विकारलं. त्याआधी पत्रकारिता, साहित्य आणि कायदे तज्ज्ञ म्हणून त्यांनी बंगालमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. १९७३ साली केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना उद्योगमंत्रालयाचं राज्यमंत्रीपद मिळालं. मात्र, 1975 साली महसूल आणि बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांची प्रमुख जबाबदारी देण्यात आली. आणि वयाच्या ४० व्या वर्षी प्रणवदा स्वतंत्र विभागाचे मंत्री बनले.

 

 

प्रणव मुखर्जी यांच्या कामामुळं खुद्द इंदिरा गांधीसुद्धा प्रभावित झाल्या होत्या. इंदिराजींच्या आवडत्या मंत्र्यांच्या यादीत प्रणवदांचं नाव घेतलं जाऊ लागलं. राज्यसभेच्या नेतेपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. शिवाय १९८० साली साली वाणिज्य मंत्रालयाचं कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. दोन वर्षानंतरच त्यांना अर्थमंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. तसंच काँग्रेस वर्किंग कमिटीमध्येही त्यांना स्थान मिळालं. बँकिंग क्षेत्रात प्रणवदांनी केलेल्या सुधारणांची चर्चा जगभरात झाली. त्यांच्या या करिष्म्याची दखल घेत जगातील सर्वोत्कृष्ट अर्थमंत्री पदाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांना महत्त्वाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली.

 

 

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाचा दावेदार म्हणून नाव घेतलं जाऊनही खुद्द प्रणवदांनी स्वतःला या शर्यतीपासून दूर ठेवलं. राजीव गांधी पंतप्रधान बनताच बंगाल काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं. मात्र, काही काळानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि त्यांच्यातल्या मतभेदांची चर्चा सुरु झाली. पक्षाशी एकनिष्ठ नसल्याचा आरोप करत त्यांना १९८६ साली काँग्रेसपासून बाजूला करण्यात आलं. मात्र, हा दुरावा फार काळ राहिला नाही. १९८९ साली राजीव गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसनं प्रणवदांना पुन्हा जवळ केलं.

 

.