www.24taas.com, नवी दिल्ली
स्फोट करा, जिहादसाठी मरा, असं म्हणत कसाबसह १० क्रुरकर्मा दहशतवाद्यांना अबू जिदांल हा २६/११च्या हल्ल्यात मदत करीत होता. सारं मार्गदर्शन अबूचेच होते. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार जबिउद्दीन अन्सारी उर्फ अबू जिंदालला याला दिल्ली पोलिसांनी इंदिरा गांधी विमानतळावर गजाआड केलं. दिल्ली पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी एकत्रित ही कारवाई केली. दिल्ली कोर्टात त्याला हजर केल्यानंतर, त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. अबूच्या चौकशीसाठी मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसची टीम दिल्लीला जाणार आहे. मॅजिस्ट्रेट कोर्टानं अबूच्या विरोधात हजर करण्यासाठी वॉरंट जारी केलं.
२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड अबू जिंदाल उर्फ सय्यद जबीउद्दीन उर्फ रियासत अली. अशा तब्बल २३ नावांनी हा दहशतवादी परिचित आहे. लष्कर ए तोयबाच्या भारतातील प्रमुख दहशतवाद्यांमध्ये अबू जिंदालचा समावेश आहे. ३० वर्षीय अबू जिंदाल हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या गेवराईचा रहिवासी आहे.. सुरुवातीला तो सिमी संघटनेशी संबंधित होता, त्यानंतर २००६ सालापासून तो लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात आहे.. २६/११ हल्ल्यावेळी अबू जिंदाल कराचीत होता, हल्ला करणाऱ्या १० दहशतवाद्यांशी कराचीतून तो सतत संपर्कात असल्याचं सांगण्यात येतं.
२६/११च्या हल्ल्यात सहभागी झालेल्या कसाबसह १० दहशतवाद्यांना अबू जिंदालने हिंदी आणि मराठीचे प्रशिक्षण दिले होते.. तसचं मुंबईची माहिती करुन देणारे व्हिडिओही अबू जिंदालनेच हल्लेखोरांना उपलब्ध करुन दिले होते.. यासह पुण्यात जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण, २००६ साली अहमदबादमध्ये झालेले बॉम्बस्फोट, २००६ साली वेरुळमध्ये जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्या प्रकरणातही अबू आरोपी आहे. अबू जिंदाल म्हणून दहशतवादी संघटनांमध्ये परिचित असलेल्या या दहशतवाद्यानं अनेक क्रूर बॉम्बस्फोट घडवून आणले. ७ नोव्हेंबर मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरण, २०१० साली चिन्नास्वामी स्टेडियम बॉम्बस्फोट प्रकरणातही अबूचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
२००६ पासून तो एटीएसच्या रडारवर होता. त्याच्या अटकेसाठी इंटरपोलतर्फे नोटीसही जारी करण्यात आली होती. मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी केलेल्या संभाषणाच्या नमुन्यांवरुन आता त्याची चौकशी होणार आहे. अबूच्या अटकेनं मुंबई हल्ल्याशी संबंधित नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.