मुकुल कुलकर्णी, www.24taas.com, नाशिक
नाशिकच्या नाट्य चळवळीला शेवटची घरघर लागली की काय, अशी परिस्थिती निर्माण झालीय. महापालिकेच्या उदासीनतेमुळे नाट्यरसिकांचा रसभंग होतोय. तांत्रिक दोषामुळे नाटकांमध्ये व्यत्यय येतोय तर अपुऱ्या सोयी सुविधांमुळे कलाकाराही नाशिककडे पाठ फिरवतायत.
आपल्या लेखणीनं रंगभूमी समृद्ध करणाऱ्या वि. वा. शिरवाडकरांच्या नाशकातच नाट्य चळवळीला घरघर लागलीय. नुकताच नाशिकमध्ये मृगरंजनी ह्या संगीत नाटकाचा कालिदास कलामंदिरात झाला. नाटकाचा आत्माच संगीत असल्यानं सर्वच दर्दी श्रोते होते. मात्र सदोष ध्वनीक्षेपकामुळे रसिकांचा पुरता हिरमोड झाला. प्रत्येक गाण्याच्या वेळी रसभंग होऊ लागल्यानं अर्धा तास प्रयोग थांबवावा लागला. यावर कलाकारांनीही नाराजी व्यक्त केलीय.
नाशिकमध्ये कालिदास कलामंदिरसह पंचवटीत पंडित पलुस्कर सभागृह, भाभानगरमध्ये दादासाहेब गायकवाड सभागृह आहे. या व्यतिरिक्त नाशिकरोड आणि सातपूर परिसरात महापालिकेनं टाऊन हॉल बांधलेत. पण त्यांचा फारसा उपयोग होत नाही, पंडित पलुस्कर सभागृहाची आसन क्षमता फक्त १९२ आहे. त्यामुळे नाटकांसाठी हे सभागृह छोटं आहे. तर दादासाहेब गायकवाड सभागृहाची आसन क्षमता तब्बल २ हजार ८५१ इतकी आहे. नाटकाला इतकी गर्दी होणार का, या धास्तीमुळे आयोजकांनी गायकवाड सभागृहाकडे पाठ फिरवलीय.
नाशिकच्या नाट्य चळवळीला उभारी द्यायची असेल तर त्याला राजाश्रय देण्याची गरज ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केली होती. मोठ्या कलाकारानं नाशिकमध्ये येऊन प्रशासनाचे कान टोचले तरीही त्याचा उपयोग झाला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर भविष्यात नाट्य निर्माते नाशिकला पसंती देतील का हा खरा प्रश्न आहे.