कोण आहेत संभाजी भिडे?

कोरेगाव भिमा दंगलीतल्या कथित सहभागामुळं संभाजी भिडे गुरूजी सध्या वादाच्या भोव-यात सापडले आहेत. 

Updated: Jan 5, 2018, 10:00 PM IST
कोण आहेत संभाजी भिडे?  title=

मुंबई : कोरेगाव भिमा दंगलीतल्या कथित सहभागामुळं संभाजी भिडे गुरूजी सध्या वादाच्या भोव-यात सापडले आहेत. 

भिडे गुरूजींना अटक करण्याची मागणी रिपब्लिकन नेत्यांनी केलीय. तर भिडे गुरूजींनी सर्व आरोपांचा इन्कार केलाय. हे भिडे गुरूजी नेमके आहेत तरी कोण, नेमके त्यांच्यावरच का आरोप होत आहेत हे जाणून घेऊया...

संभाजी भिडे यांचे खरे नाव काय? 

मनोहर भिडे हे त्यांचं मूळ नाव, पण संभाजी भिडे गुरूजी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. वय वर्षं 80 आहे. या वयातही ते दररोज १५० जोर, १५० बैठका आणि १५० सूर्यनमस्कार घालतात. पायात चपला न घालता अनवाणीच फिरतात. प्रवास करायचा झाला तर सायकल किंवा एसटीनंच. साता-यातलं सबनीसवाडी हे त्यांचं मूळ गाव. न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एम.ए. केल्यानंतर ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते. पूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. मात्र मतभेद झाल्यानंतर त्यांनी 1984 मध्ये श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान नावाची संघटना उभी केली. या संघटनेत विविध जातीधर्माच्या तरूणांचा समावेश असून, त्यातल्या प्रत्येकाला धारकरी म्हणतात...

गडकोट मोहीम आणि दुर्गामाता दौड असे दोन प्रमुख कार्यक्रम ही संघटना राबवते. नवरात्रौत्सवाच्या काळात नऊ दिवस चालणा-या या दौडीची सांगता दस-याला होते. दररोज रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा, राज्याभिषेक दिन, धर्मवीर बलिदान मास, जनजागरण, इतिहास अभ्यास परिषद असे धार्मिक आणि प्रबोधनपर कार्यक्रम संघटनेमार्फत राबवले जातात. आतापर्यंत एक लाख शिवचरित्र घराघरात पोहोचवण्याचे श्रेय भिडे गुरूजींनाच दिलं जातं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चांगलीच जवळीक आहेत. एवढंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी देखील त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. सर्वच पक्षातील नेते भिडे गुरुजींना गुरुस्थानी मानतात. १ मे २०१६ रोजी सांगलीत शिवसेना आणि शिवप्रतिष्ठान यांचा संयुक्त मेळावा झाला होता. त्यावेळी भिडे गुरूजींनी शिवसेनेचं कौतुक करताना, भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली होती.

कोरेगाव भिमामध्ये उसळलेली दंगल त्यांच्याच चिथावणीमुळं भडकली, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. तर यामागं राजकीय षडयंत्र असून, त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी भिडे गुरूजींनी केलीय. सत्ताधारी राजकीय पक्षात भिडे गुरूजींचा आदर करणारे नेते असल्यानं त्यांना लक्ष्य केलं जातंय का? शिवसेनेशी असलेली जवळीक त्यांना नडलीय का? आणि भिडे गुरूजींना लक्ष्य करण्यामागं कुणाचा हात आहे? असे सवाल आता उपस्थित होतायत... यानिमित्तानं भिडे गुरूजी प्रकाशझोतात आले आहेत.