मुंबई : मेट्रोचं कंत्राट मिळवण्यासाठी मुंबईत गँगवॉर सुरू झालंय का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी उपस्थित केलाय. शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावरील हल्ला हा कंत्राट मिळवण्यासाठी झाला की पक्षांतर्गत वादातून याची चौकशी करण्याची मागणीही मलिक यांनी केलीय.
शनिवारी शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. रात्री बाराच्या सुमारास मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर भागात अज्ञातांकडून काते यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Mumbai: Shiv Sena MLA Tukaram Kate escapes unhurt in an attack by unidentified miscreants with a sword late last night. His bodyguard (in picture) & two party workers injured in the attack. #Maharashtra pic.twitter.com/EV696KqQDn
— ANI (@ANI) October 13, 2018
महाराष्ट्र नगर परिसरात मेट्रो-३ प्रकल्पातील कारशेडचे काम सुरु आहे. दिवसरात्र सुरु असणाऱ्या या कामामुळे स्थानिक रहिवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याविरोधात काते यांच्या नेतृत्त्वाखाली नुकताच मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा कारशेडचे काम थांबवण्यात आले होते. मात्र, काही दिवसानंतर पुन्हा या कामाला सुरुवात झाली. तुकाराम काते यांनी काल रात्री आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन हे काम पुन्हा थांबवले. तेथून परतत असताना काते यांच्यावर हल्ला झाला.
सुरक्षारक्षकांमुळे काते या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेत. या हल्ल्यात काते यांच्या सुरक्षारक्षकासह अन्य दोघे गंभीर जखमी झालेत. मेट्रोच्या कंत्राटदाराने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप आमदार काते यांनी केलाय.
तुकाराम रामकृष्णा काते मुंबईतल्या अनुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.