मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद, सातही तलावांनी तळ गाठला

 राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत.  

Updated: Jun 27, 2019, 10:29 AM IST
मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद, सातही तलावांनी तळ गाठला title=
संग्रहित छाया

मुंबई : मान्सूनचे ढग दाटायच्या दिवसात राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत. पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. त्यात चिंता वाढविणारी बातमीची भर पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी संकट गहिरे होत चालले आहे. महापालिकेने आपल्या राखीव कोट्यातून शहराला पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाऊस पडला नाही तर पाणी पाणी करण्याची वेळ येऊ शकते.

मुंबई शहराला अवघा २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांनी तळ गाठला असून सगळ्या तलावात मिळून फक्त ७३ हजार ७८४ दशलक्ष लीटर पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा जवळपास अडीच लाख दशलक्ष लीटर इतका होता. 

जून महिना संपायला आता केवळ तीन दिवस उरलेत. तरीसुद्धा तलाव क्षेत्रात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता देशाच्या आर्थिक राजधानीवर कधी नव्हे इतके पाणी संकटाचे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनो पाणी जपून वापरा अन्यथा एक दिवसाआड पाणी सोडावे लागेल.