'भारतीय कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार म्हणजे आपल्या घरचा डब्बा तिकडे नेऊन खायचा..' ठाकरेंचा टोला

Aditya Thackeray On Davos Tour: आदित्य ठाकरे यांनी दावोस दौऱ्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य सरकारवर टीका केली आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jan 24, 2025, 06:01 PM IST
'भारतीय कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार म्हणजे आपल्या घरचा डब्बा तिकडे नेऊन खायचा..' ठाकरेंचा टोला title=
आदित्य ठाकरे

Aditya Thackeray On Davos Tour: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दावोस दौऱ्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. दावोसमध्ये ज्या कंपन्यांसोबत करार केल्याचा दावा केला जातोय, त्यातील बहुतांश कंपन्या या भारतीय आहेत. असे असताना दावोसमध्ये जाऊन करार करण्याची गरज काय? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय.

घटनाबाह्य मुख्यमंत्री यांनी 28 तासांत दावोस दौ-यात कसे पैसे खर्च केले होते ते पाहिले.यावेळी तसे काही झाले नाही हे आनंदाचे आहे आताच्या मुख्यमंत्र्यांनी एवढी गुंतवणूक आणलीय ज्यामुळे एसटीचे विलीनकरण, लाडक्या बहिणीना पैसे.. अशी कामे होतील असे आदित्य ठाकरे म्हणाले. एक दोन गोष्टी लोकांसमोर नक्की आणू. जे जाहीर झाले त्यात 54 करार कंपन्यांसोबत केले आहेत. त्यातून विदेशी कंपन्या 11 आहेत आणि भारतीय कंपन्या 43 आहेत आणि 31 कंपन्या या राज्यातल्या आहेत. एवढ्या जर राज्यातील कंपन्या असतील तर गेल्या २ वर्षात मॅग्नेटिक महाराष्ट्र घेऊन इथेच का करार केला नाही? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला.  

मीदेखील दावोसमध्ये जाऊन विदेशी कंपन्या आणि भारतीय कंपन्या यांच्या गुंतवणूक आणल्या. तिथे दावोसमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमधले लोक येतात आणि त्यांना भेटायची वेळ मिळते. पण या लोकांना न भेटता आपल्याच इथल्या लोकांच्या भेटी घेऊन आपला इन्वेस्टमेंटचा फुगा मोठा दिसावा असा प्रयत्न केला गेलाय. वेगवेगळ्या उद्योगपतींशी बोलणे कुठेच झाले नाही असे दिसले. दावोसच्या अर्ध्या किमतीत तुम्ही इकडेच केले असते. इथेच भेटी घेतल्या असत्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

यामध्ये 4 लाख कोटींचे करार हे एमएमआरडी आणि सिडकोने केले आहेत. नगरविकास मंत्री गावात आणि मुख्यमंत्री दावोसमध्ये..., खाते तिकडे आणि मंत्री इकडे. मंत्र्यांवर अन्याय झालाय. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसतेय. त्यांच्या खात्यातील लोक तिकडे नेलेत. मुख्यमंत्र्यांनीपण नगरविकास मंत्र्यांना नाही नेले, अशी टीका ठाकरेंनी केली. 

हिरानंदानी ग्रुप सोबत काही करार केले आहेत.स्पेशल प्लॅनिंगमध्ये त्यांच्यासोबत 6 बिलियनचा करार केला आहे. ते आधीपासून काम करत आहेत. मग पुन्हा करार कशाला? रहेजासोबत करार केला आहे.जिथे बिल्डरने जागा घेतली आहे. त्याच जागी यांनी करार केला आहे. आता रस्ते कंत्राटदार आणि एसआरए यांच्यासोबत ही हे करार करतील

नगरविकास खाते तिकडे असताना नगरविकास मंत्र्याना नेले नाही.उद्योगमंत्री तिकडे असताना कधी पाहिले का? मुख्यमंत्री तिथे असताना उद्योगमंत्री तिकडे उशिरा पोहोचले. तिकडे जाऊन करार करणे म्हणजे आपल्या घरचा डब्बा घेऊन जायचे आणि तिकडे खायचा असे झाल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

उद्योगमंत्री एक दिवस उशिरा पोचले दुसऱ्या दिवशी ते परत आले. एक दिवस ते कुठे गेले काय माहीत शॉपिंगला गेले असावेत तिकडे 7 अधिकारी होते पण उद्योगमंत्री असले पाहिजेत ना? का उशिरा आले? का लवकर आले? शिंदे नाराज होते म्हणून त्यांना पाठवण्यात आले. मुख्यमंत्री जर तिकडे बसत असतील तर उद्योग मंत्री का नाही बसले? असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी विचारला.