First Video After Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्रीनंतर मुंबईत राहत्या घरी चोरट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रात्री अडीचच्या सुमारास हा हल्ला झाल्यानंतर साडेतीन वाजता सैफला लिलावती रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अशातच आता या दुर्घटनेनंतर सैफच्या घरी काय परिस्थिती होती हे दर्शवणारा व्हिडीओ समोर आला आहे.
सैफ अली खान हा वांद्र्याताली 'सद्गगुरु शरण' इमारतीमध्ये 12 व्या मजल्यावर वास्तव्यास आहे. सैफने या इमातीमध्ये चार मजले विकत घेतले असून सर्व फ्लॅट्स आतमधून एकमेकांना जोडलेले आहेत. गुरुवारी मध्यरात्रीनंतर रात्री 2 च्या सुमारास सैफच्या घरात चोरटा घुसल्याचं घरात काम करणाऱ्या महिला हाऊस किपरच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने आरडाओरड केली असता सैफ बेडरुममधून बाहेर आला. त्यावेळेस चोरटा सैफच्या समोरच होता. सैफला काही कळण्याआधीच आता आपण पकडले जाणार या भीतीने चोरट्यानं सैफवर चाकू हल्ला केला.
सैफवर सहा वार झाले असून त्याची मान आणि पाठीवर वार करण्यात आले. सैफच्या पाठीत चाकू खुपसल्यानंतर घरातील कर्मचाऱ्यांची भांबेरी उडली. त्यांनी तातडीने सैफला सावरण्याचा प्रयत्न करत त्याला रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, या घटनेनंतर चोर गोंधळाचा फयदा घेऊन पळून गेला.
सैफवर हल्ला झाल्यानंतर 'सद्गगुरु शरण' इमारतीमधील दृष्य 'व्हिरल भयानी'च्या पापाराझींनी कॅमेरामध्ये कैद केली आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला हातवारे करुन काहीतरी सांगत असून तिच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्टपणे दिसत आहे. तर व्हिडीओमध्ये करीना घरच्या कपड्यांमध्ये पडलेल्या चेहऱ्याने येरझाऱ्या घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. इमारतीच्या गेटवर एक रिक्षावालाही उभा असल्याचं पाहायला मिळत आहे. सैफला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रिक्षावाल्याला बोलावण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा सैफवर हल्ला झाल्यानंतरचा पहिलाच व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफला झालेल्या सहा जखमांपैकी दोन जखमा खोलवर झाल्या आहेत. सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा त्याच्या पाठीत खुपसलेला चाकू तसाच होता. शस्त्रक्रीया करुन चाकू काढण्यात आला आहे. सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तपासासाठी 7 टीम तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी तीन टीम मुंबईत तर एक टीम राज्याबाहेर तपास करणार असून अन्य टीम या प्रकरणाशीसंबंधित इतर धागेदोरे शोधत आहे.