'शाखाप्रमुख फोडला तरी गनर देतात, सामान्यांची सुरक्षितता मात्र...' सैफवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Sanjay Raut on Saif ali khan attack : अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञातानं केलेल्या हल्ल्यावर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.   

सायली पाटील | Updated: Jan 16, 2025, 11:03 AM IST
'शाखाप्रमुख फोडला तरी गनर देतात, सामान्यांची सुरक्षितता मात्र...' सैफवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल title=
shivsena ubt party leader sanjay raut on saif Ali khan attacked by unknown

Sanjay Raut on Saif ali khan attack : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्याच मुंबईतील राहत्या घरात घुसून अज्ञातानं चाकू हल्ला केला. मध्यरात्रीनंतर अभिनेत्यावर हा हल्ला करण्यात आला, ज्यानंतर त्याला तातडीनं उपचारांसाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथं अभिनेत्यावर उपचार सुरू असतानाच सर्व स्तरांतून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. 

शिवसेना उद्धव बाळासाहेबर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या हल्ल्याला केंद्रस्थानी ठेवत सेलिब्रिटींसह राज्यातील सामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित केला. 'महाराष्ट्रात सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे. रस्त्यावर, घरात, चोर घुसतात काय दरोडा टाकतात काय... हे कलाकार आहेत ज्यांच्या घराला सुरक्षा आहे तिथंही आता चोर घुसतात आणि हल्ला करतात. हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे. पंधरा दिवसांपूर्वीच सैफ सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते. तिथं पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबासमवेत एक तास व्यतीत केला होता. त्यानंतर हा हल्ला झाला. हा हल्ला चोरांनी केला कोणी केला काय ठाऊक? पण, या राज्यात कोणी सुरक्षित नाही', असं ते म्हणाले. 

महिलांना रस्त्यावर फिरणं कठीण झालं आहे हे गृहमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असा संतप्त सूर आळवत या राज्याची 90 टक्के सुरक्षा पोलीस, महायुती आणि फुटलेल्या आमदारांसाठी तैनात आहे असा सणसणीत टोला राऊतांनी लगावला. 'साधा शाखाप्रमुख फोडला तरी त्याला दोन गनर दिले जातात. उप तालुकाप्रमुख फुटला तर एक गनर, जिल्हाप्रमुख फोडला तर पाच गनर असं त्यांचं एक कोष्टक आहे. पण, सामान्य माणसाला कोणतीही सुरक्षा नाही', हे दाहक वास्तव समोर आणत त्यांनी राज्यातील सुरक्षा यंत्रणेला धारेवर धरलं. 

'गद्दार आणि बेईमान, भ्रष्टाचारी, बिल्डर यांना पूर्ण सुरक्षा आहे. सैफ अली खानलाही पूर्ण सुरक्षा असेल. कधीकाळी भारत सरकारनं तर त्याला पद्मश्रीही दिला आहे. तर, पद्मश्री किताब असलेल्या व्यक्तीलाही मुंबईत सुरक्षित राहता येत नाही हे आज दिसून आलं आहे. आता यावर कोण काय भाष्य करणार पोलीस तपास करणार, चोराला पकडणार.,..पण असे किती चोर पकडणार?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  

हेसुद्धा वाचा : सैफ अली खानचं मुंबईतील घरही जणू एक महाल; पारंपरिक गोष्टींना मॉडर्न टच, पाहा Royal Photos 

मुळात कायद्याचं उल्लंघन करणं, हल्ले करणं ही कायद्यासंदर्भातील भीती कोणाच्या मनात राहिली नाही, असं म्हणत सैफवरील हल्ला हा दुर्दैवी असून, आज पुन्हा एकदा सरकार उघडं पडलं आहे अशा शब्दांत त्यांनी नाराजीचा तीव्र सूर आळवला. 

नागपूरमधील अत्याचाराच्या घटनेवर राऊत काय म्हणाले? 

नागपूरमधील मानसोपचार तज्ज्ञाकडून महिलांवर केल्या जाणाऱ्या अत्याचार प्रकरणावरही राऊतांनी कटाक्ष टाकला. 'या घटना वाढत असून, फडणवीसांनी यात लक्ष घातलं पाहिजे. 100 महिलांवर अत्याचार होईपर्यंत पोलीस काय करत होते? हे काय एका दिवसात झालेलं नाही, गेल्या तीन चार वर्षांपासून स्वत फडणवीस राज्याचे गृहमंत्री असल्यामुळं त्यांनी यावर भाष्य केलं पाहिजे', असं ते म्हणाले.