3000000 Dogs Will Be Killed: भटक्या कुत्र्यांकडून होणारे हल्ले हे साधारणपणे वरच्यावर वाचण्यात येणाऱ्या बातम्यांपैकी झाल्या आहेत. भारतामधील अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर आणि यासंदर्भातील हल्ल्यांनंतर अनेकदा या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. मात्र अनेकदा अशा कारवाईदरम्यान प्राणीप्रेमी आडकाठी घालताना दिसतात. यावरुनच नागरिक आणि प्राणीप्रेमींमध्ये वादाची ठिणगी उडताना दिसते. असं असतानाचा आता एका देशाने या भटक्या कुत्र्यांना संपवण्याचा निर्णय घेतला आहे. या देशातील 3 लाख भटक्या कुत्र्यांना संपवलं जाणार आहे. यासाठी कारणीभूत ठरणार आहे या देशात भरवण्यात येणारी एक मोठी स्पर्धा.
ज्या देशाबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे मोरक्को! या छोट्याश्या देशाने स्वच्छता मोहिमेअंतर्गत शहरामधील कुत्र्यांना संपवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हा देश सुरक्षा, उपलब्ध सुविधा आणि स्वच्छता या स्तरांवर फुटबॉलच्या फिफा वर्ल्ड कप 2030 च्या तयारीला लागला आहे. त्याअंतर्गतच 30 लाख भटक्या कुत्र्यांना मारुन टाकण्याचा या देशातील यंत्रणेचा विचार आहे. मात्र या नियोजनावर सर्वच स्तरातून टीका होताना दिसत आहे. खास करुन प्राणी मित्रांनी या मोहिमेला विरोध केला आहे. यापूर्वीच या देशात हजारो भटक्या कुत्र्यांना ठार करण्यात आल्याचा आरोप या प्राणीमित्रांनी केला आहे. यासंदर्भात प्राणीमित्रांनी थेट फिफाच्या अध्यक्षांनाही पत्र लिहिलं आहे. हा प्रकार म्हणजे निर्दयीपणाचा भयानक प्रकार असल्याचं प्राणीमित्रांनी म्हटलं असलं तरी याकडे फिफा पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.
प्राणीमित्र जेन गुडॉल यांनी फिफाकडून प्राणीमित्रांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं म्हटलं आहे. या मोहिमेसंदर्भातील कागदोपत्री दस्तावेज पाहून आपल्याला धक्का बसल्याचं जेन म्हणाल्या. त्यांनी या क्रूर कृत्यावर अनेक फुटबॉल चाहते काय म्हणतील? अनेक फुटबॉल चाहते हे प्राणीप्रेमी असून त्यांचं यावर म्हणणं काय आहे? असा सवाल जेन यांनी केला आहे. फिफाने या कृत्याला विरोध केला नाही तर त्यांची प्रतिमा मलिन होण्याबरोबरच याचे दुरोगामी परिणाम सहन करावे लागतील असा इशारा जेन यांनी दिला आहे.
"खरोखरच एवढ्या मोठ्या प्रमाणात कुत्र्यांना संपवलं तर फिफा पुन्हा चर्चेत येईल. मागील काही काळापासून मोठ्या घोटाळ्यांमुळे फिफाचं नाव मलिन झाल्याचं मला माहित आहे. हेच नाव पुन्हा मिळवण्यासाठी फिफाची धडपड सुरु आहे. मात्र तुम्ही हे श्वानांना संपवण्याचं कृत्य रोखलं नाही तर तुमचं नाव नक्कीच अधिक मलिन झाल्याशिवाय राहणार नाही," असा इशाराच जेन यांनी दिला आहे. तातडीने अशाप्रकारे श्वानांना संपवण्याची मोहिम थांबवण्याची मागणी केली जात आहे.