Assembly Election results 2018: मतदारांनी नको त्यांना उखडून फेकलं- उद्धव ठाकरे

मला मतदारांच्या धाडसाचं कौतुक वाटतं.

Updated: Dec 11, 2018, 05:06 PM IST
Assembly Election results 2018: मतदारांनी नको त्यांना उखडून फेकलं- उद्धव ठाकरे title=

मुंबई: विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सणसणीत टोला हाणला आहे. या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने भारतीय जनतेने राज्यकर्त्यांना योग्य तो संदेश दिला आहे. मतदारांनी नको त्यांना उखडून फेकले. पुढचा पर्याय कोण किंवा ईव्हीएम घोटाळा अशा फालतू चर्चांमध्ये न अडकता जनतेने त्यांच्या मनाला पटणारा निर्णय घेतला. निवडणुकीत विजय-पराभव होतच असतात. मात्र, मी चार राज्यांमध्ये परिवर्तन घडवणाऱ्या मतदारांच्या धाडसाचं कौतुक करतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या या पराभवानंतर आगामी निवडणुकीत भाजप शिवसेनेशी युती करण्यासाठी आग्रह धरेल, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, शिवसेनेने आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेनेची मनधरणी करताना भाजपला बरीच कसरत करावी लागेल. 

विधानसभा निवडणुकीचे आतापर्यंत हाती आलेले कल पाहता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या प्रमुख राज्यांमध्ये भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागणार आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, हे जवळपास स्पष्ट झालेय. 

या निकालांनंतर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या गोटात आनंदाला उधाण आले आहे. काँग्रेसने सर्व ठिकाणी जोरदार कमबॅक केले आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर हे निकाल काँग्रेस कार्यकर्त्यांचा हुरुप वाढवणार आहेत. तर दुसरीकडे या निकालांमुळे भाजपला आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे.