महाराष्ट्रात 'ठाकरे सरकार'; मुख्यमंत्री व्हायला उद्धव तयार

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव स्वीकारला

Updated: Nov 22, 2019, 09:13 PM IST
महाराष्ट्रात 'ठाकरे सरकार'; मुख्यमंत्री व्हायला उद्धव तयार title=

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव स्वीकारला आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, असं शिवसेना नेत्यांबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही आग्रह होता, हा आग्रह उद्धव ठाकरेंनी स्वीकारला असल्याचं राऊत म्हणाले आहेत.

महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठीच्या घडामोडींना वेग आला आहे. यासाठीच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक मुंबईत झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमती झाली आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं. महाविकासआघाडीची उद्या पत्रकार परिषद व्हायची शक्यता आहे, असं शरद पवार म्हणाले.

अजून काही बारकावे शिल्लक आहेत, त्यावर चर्चा सुरु आहे. जेव्हा हे सगळं अंतिम होईल तेव्हा तिन्ही पक्षांचे नेते आपल्याला भेटतील, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. 'बऱ्याच गोष्टींवर आम्ही मार्ग काढला आहे. पण एकही मुद्दा अनुत्तरित ठेवायचा नाही, असं आम्ही ठरवलं आहे. म्हणून सगळे विषय सोडवल्यानंतर सगळ्या विषयांची उत्तर घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत. चर्चा चांगली आणि योग्य दिशेने सुरू आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकार स्थापनेसाठी सकारात्मक चर्चा झाली आहे. काही मुद्द्यांवर उद्या पुन्हा चर्चा होणार आहे, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. महाविकासआघाडीची बैठक मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये सव्वा दोन तास चालली.  शिवसेनेकडून या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आले होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल, अहमद पटेल आणि बाबा सिद्दीकी यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.