कोकणात जायचं म्हटलं तर अनेकदा एक्स्प्रेस ट्रेनलाच प्राधान्य दिलं जातं. त्यात जर रस्त्याने जायचं असेल तर मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करण्याऐवजी कोल्हापूर मार्गे जाण्याला पसंती दिली जाते. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी असणारे खड्डे, बांधकाम यामुळे कोकणवासीय नेहमी तक्रार करत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणवासीय मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी योग्य कधी होणार याची वाट पाहत आहेत. त्यातच आता रवीद्र चव्हाण यांनी यावर भाष्य केलं आहे. नुकतंच भाजपाने रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांसह मुंबई-गोवा महामार्गावरही भाष्य केलं.
"मुंबई गोवा महामार्गाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. जे काम शिल्लक आहे त्यामध्ये रत्नागिरीमधील काही भाग आहे. ज्यामध्ये मिरा, कोल्हापूर, नागपूर असा जो रस्ता आहे. तो एलिव्हेटेड मार्गे असल्याने तेथील थोडं काम शिल्लक आहे. थोड्या अंशी काम शिल्लक आहे. काही बदमाश कंत्राटदारांमुळे गडबड झाली, ज्यामुळे रस्ता रखडला होता. पण 80 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झालं आहे," असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे.
"चर्चा थोडी राजकीय आहे यात काही शंका नाही. पण कोकणात जाणारा प्रत्येकजण समाधान व्यक्त करत आहे. रस्ता चांगला झाला आहे असं म्हणणारेही आहेत. नितीन गडकरींचंही यावर लक्ष आहे. त्या रस्त्याने नितीन गडकरींनाही प्रचंड मनस्ताप दिला आहे. भाजपाने महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर दिली असली तरी मी कोकणातील आहे, माझं गाव कोकणात आहे. त्यामुळे रस्त्यासाठी जीव ओतून काम केलं आहे. त्यामुळे कित्येक वर्षं रखडणाऱ्या या रस्त्याला न्याय देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे त्यावर 100 टक्के लक्ष आहे," असंही त्यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले, "रस्ता लवकर पूर्ण कसा होईल यासाठी नितीन गडकरींना नेहमीच आम्ही या सगळ्या गोष्टी सांगत असतो. 15 -20 टक्के काम जे राहिलं आहे ते मे महिन्याच्या आधी पूर्ण होईल यात काही शंका नाही".